बारामती : पुढारी वृत्तसेवा : गाळ माती उपसा करण्याच्या कारणावरून तिघांना बेदम मारहाण करणा-या 13 जणांना येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. ए. आपटे यांनी पाच महिने कारावास व प्रत्येकी 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दिगंबर गुलाब मासाळ, शरद गुलाब मासाळ, पिंटू उर्फ प्रेमचंद दिगंबर मासाळ, वैभव शरद मासाळ, कुंडलिक बापू माने (मयत), जालिंदर कुंडलिक माने, गेना बापू माने, दत्तात्रय संपत पडळकर, मंगल दिगंबर मासाळ, आनंदी शरद मासाळ, राणी जालिंदर माने, छबूताई कुंडलिक माने, कमल बबन माने व रतन संपत पडळकर (रा. कानाडवाडी, ता. बारामती) या 14 जणांविरोधात या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी प्रकाश तुळशीराम भगत यांनी फिर्याद दिली होती.
गाळ माती उपसण्याच्या कारणावरून 20 एप्रिल 2012 रोजी झालेल्या वादात फिर्यादीसह त्यांच्या आई-वडिलांना बेदम मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक जी. बी. पांढरे यांनी केला. या प्रकरणाचा निकाल तब्बल 12 वर्षांनी लागला. त्यात मयत कुंडलिक वगळता अन्य आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील नितीन होळकुंदे यांनी आठ साक्षीदार तपासले. त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने 13 जणांना पाच महिने कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षाला पोलिस शिपाई एम. के. भोईटे यांचे सहकार्य मिळाले.