पाहू नाट्य संमेलन विसरू नका कोणी; लोक कलावंताकडून नाट्य संमेलनाचा प्रचार | पुढारी

पाहू नाट्य संमेलन विसरू नका कोणी; लोक कलावंताकडून नाट्य संमेलनाचा प्रचार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात सर्वत्र पिंगळा, गोंधळी, वासूदेव आदी पारंपरिक लोक कलावंतांकडून नाट्य संमेलनाचे निमंत्रण देत देऊन प्रचार करण्यात येत आहे. पहाटेच्या वेळी वासुदेव लोकवस्तीत जाऊन सर्वसामान्य नागरिकांना नाट्य संमेलनासाठी आमंत्रित करत आहेत. त्यामुळे उद्योगनगरी ही सांस्कृतिक वातावरणात न्हावून निघाली आहे. ‘

ऐका दादा- वहिनी, ऐका दादा वहिनी’ तुम्ही यायचं जोडीने’. ‘पाहू नाट्य संमेलन विसरू नका कोणी’ ‘कलावंतांचा ़फुलणार मळा तिथं सार्‍यांनी व्हायचं गोळा’; ‘आहे आनंदाचा हा सोहळा, जीवन जगण्याची जणू ही शाळा’ ‘सहा तारीख, सात तारीखनव्या वर्षाची पर्वणी पाहू नाट्य संमेलन विसरू नका कोणी, असे प्रचार गीत गाऊन हे लोककलावंत नांगरिकांपर्यंत नाट्य संमेलन पोहचवत आहेत. नागरिक नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर यांच्या या संकल्पनेचे कौतुक करत आहेत.

या विषयी बोलताना नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर म्हणाले की, काळाच्या पडद्याआड लोप पावत चाललेली जी लोककला आहे. ती पुन्हा लोकांपर्यंत पोहचावी या उद्देशाने आम्ही या 100 व्या नाट्य संमेलनाच्या प्रचारासाठी या लोककलांना निमंत्रित केले आहे. यामुळे लोपपावत चाललेली लोककलादेखील आम्ही नाट्य रासिकांपर्यंत पोहचवू शकलो. भारुडी, पिंगळा, गोंधळी, वासूदेव, भिल्ल, डोंबारी, धनगर असे अस्सल लोककलवंत निलंगा, धाराशिव, सोलापूर, अकोला या भागातून आलेले आहेत. सर्व घटकांना सामावून घेऊन हा नाट्य संमेलनाचा सोहळा साजरा करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

हेही वाचा

Back to top button