बार्टीने फिरवला निर्णय; परीक्षा रद्दचा निर्णयच रद्द : 10 जानेवारीला सीईटी | पुढारी

बार्टीने फिरवला निर्णय; परीक्षा रद्दचा निर्णयच रद्द : 10 जानेवारीला सीईटी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पीएच. डी. पाठ्यवृत्तीसाठी 10 जानेवारी होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) जाहीर केला होता. परंतु, हा निर्णय बार्टीने फिरवला आहे. नव्या निर्णयानुसार आता सीईटी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून पीएच.डी.धारक विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या पाठ्यवृत्तीसाठी काही दिवसांपूर्वी परीक्षा घेण्यात आली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत 2019 च्या सेट परीक्षेची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचा प्रकार समोर आला. त्यावर आक्षेप घेऊन परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या बैठकीत आधीची परीक्षा रद्द करून 10 जानेवारीला फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधक पाठ्यवृत्तीसाठी 10 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द करण्यात आल्याचे परिपत्रक बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी संकेतस्थळावर प्रसिद्ध केले.

त्यानंतर बार्टीने परीक्षा रद्द करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर सारथीने परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात आले. या पार्श्वभूमीवर, बार्टी, सारथी, महाज्योती आणि टीआरटीआय यांच्याशी समान धोरणाच्या अनुषंगाने सक्षम प्राधिकार्‍याची मान्यता घेतली नसल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधक पाठ्यवृत्तीसाठी 10 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द करण्यात आल्याचे परिपत्रक मागे घेण्यात येत आहे. परीक्षा ठरलेल्या तारखेनुसार 10 जानेवारीला घेण्यात येईल, असे बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा

Back to top button