Pimpari : जिल्हा रुग्णालय आवारातील रस्ता नादुरुस्त रुग्णांची होतेय गैरसोय | पुढारी

Pimpari : जिल्हा रुग्णालय आवारातील रस्ता नादुरुस्त रुग्णांची होतेय गैरसोय

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालय आवारातील अंतर्गत रस्ते नादुरुस्त झाले आहेत. येथील रस्त्यांची खड्डे पडून चाळण झाली आहे. त्यामुळे येथील रस्त्याने ये-जा करणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होत आहे. येथील मुख्य प्रवेशद्वाराचा रस्ता वगळता अन्य रस्ते नादुरुस्त असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

त्याशिवाय, येथील रस्त्यावर छोटे-मोठे अपघात होत असतात. नवी सांगवी फाटा ते घोलप विद्यालय रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरु आहे. त्यामुळे येथील वाहतूक सुरळीत होण्यासाठी जिल्हा रूग्णालय परिसरातील कामगार वसाहत, घोलप विद्यालय या रस्त्यावरून एकेरी वाहतूक वळविण्यात आली आहे. परिणामी नागरिकांना रहदारीसाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. येथे वाहतूक वळविल्याने वाहनांची दिवसा व रात्री मोठी वर्दळ असते.

नागरिकांच्या मागणीनुसार महापालिका प्रशासनाने येथे खडी टाकून तात्पुरती डागडुजी केली. मात्र, त्यातील खड़ी मोकळी होऊन रस्त्यावर आल्याने पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांतून नाराजीचा सूर
उमटत आहे.

येथील जागा उरो रुग्णालयाच्या नावावर आहे. त्यामुळे याबाबत उरो रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांची जबाबदारी आहे. तथापि, अंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी केलेली आहे.
                                                                                      – डॉ. नागनाथ यमपल्ले,
                                                                                       जिल्हा शल्यचिकित्सक,
                                                                                                जिल्हा रुग्णालय.

हेही वाचा

Back to top button