Pimpari : मावळात जनआरोग्य योजना रुजवणार : तालुका काँग्रेस कमिटी | पुढारी

Pimpari : मावळात जनआरोग्य योजना रुजवणार : तालुका काँग्रेस कमिटी

वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा मावळ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा फुले जनआरोग्य योजना मावळ तालुक्यातील प्रत्येक गाव खेड्यात रुजवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू करण्याचा निर्णय पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. वडगाव मावळ येथे झालेल्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्रातील दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच पिवळे रेशन कार्डधारक तसेच दारिद्र्य रेषेवरील म्हणजेच केशरी रेशन कार्डधारक या योजनेसाठी पात्र असून मावळ तालुक्यात पवना हॉस्पिटल, पायोनियर हॉस्पिटल, मायमर जनरल हॉस्पिटल, ढाकणे हॉस्पिटल, संजीवनी हॉस्पिटल लोणावळा या सक्रिय हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना राबवण्यात येत आहे. तालुक्यातील रुग्णांना प्रभावीपणे योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी काँग्रेस पक्ष प्रयत्न करणार आहे.

प्रत्येक गावात जाऊन योजनेची माहिती पोहोचविणार

तालुक्यातील प्रत्येक खेड्यापाड्यात जाऊन या योजनेविषयी आरोग्य सेवक माहिती देणार आहेत. सुमारे दीड लाख रुपये कॅशलेस स्वरूपात रुग्णवरील हॉस्पिटलमध्ये वापरू शकतात. त्यासाठी योजनेनुसार विविध पात्र आजारांची यादी समाविष्ट करण्यात आलेली आहे. एन्जिओप्लास्टी व किडनी संबंधित विविध आजारदेखील या योजनेत मोफत देण्यात येत असून, शासनामार्फत देण्यात येणार्‍या योजनेचा सर्वस्तरीय पात्र रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रामदास काकडे यांनीकेले आहे.

प्रत्येक खेड्यापाड्यात जाऊन आरोग्य सेवक, ग्रामसेवकांच्या माध्यमातून महात्मा फुले जन आरोग्य योजनेची माहिती देऊन पात्र रुग्णांसाठी वरील पाचपैकी कुठल्याही हॉस्पिटलमध्ये त्वरित उपचारांसाठी तत्पर असणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी दिली आहे.

रेशनकार्डसाठी तहसीलदारांनी सक्षम यंत्रणा उभारावी

दरम्यान, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्डची आवश्यकता असते. त्यामुळे रेशनकार्ड उपलब्ध करून देण्यासाठी तहसीलदारांनी सक्षम यंत्रणा उभारावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामदास काकडे यांनी केली आहे.

योजनेचे कार्ड वितरित करणार

आरोग्य मित्रांच्या मदतीने वरील हॉस्पिटलमध्ये प्रभावी सेवा मिळावी, यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली असून, लवकरात लवकर महात्मा फुले योजनेचे कार्ड वितरित करण्याचा कार्यक्रम काँग्रेस कमिटीतर्फे राबविण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका प्रवक्ते मिलिंद अच्युत यांनी दिली.

हेही वाचा 

Back to top button