Pimpari : स्मार्ट सिटीमधील रस्त्यांची चाळण | पुढारी

Pimpari : स्मार्ट सिटीमधील रस्त्यांची चाळण

दापोडी : नवी सांगवी व पिंपळे गुरव परिसरातील रस्त्यांची चाळण झाली असल्यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिसरामधील अनेक चेंबर खचले आहेत. त्यामुळे चालकांना स्मार्ट सिटीत वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेल्या दोन वर्षांपासून सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर आदी भागांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून स्मार्ट सिटीचे कामे केली जात आहेत.

मात्र, कामे पूर्ण होण्यापूर्वीच कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे दिसून येत आहे. याबाबत स्थानिक नागरिक व वाहनचालकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एस. एस. काटे चौकामध्ये जुनी सांगवी व पिंपळे गुरवकडून भरधाव वेगाने वाहने ये-जा करत असतात. मुख्य चौकात दगडी चिरे सिमेंटमध्ये बसविले आहेत. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अचानक ब्रेक दाबावा लागतो. पाठीमागून येणार्‍या वाहनचालकांनी अचानक ब्रेक दाबल्यामुळे किरकोळ अपघात घडत आहेत. त्यामुळे संबंधित प्रशासनाने पाहणी करून लवकरात लवकर या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.

पाणी, सिमेंट मुबलक प्रमाणात असूनही कामे निकृष्ट दर्जाची दर्जाची झाली आहेत. ठेकेदारांकडून पाणी कमी प्रमाणात वापरल्यामुळे रस्ते उखडले आहेत. तसेच, रस्त्याला भेगा पडत आहेत. तरीही संबंधित प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे.
          – संजय कणसे, दापोडी

 

मुख्य चौक असल्याने वाहनांची वर्दळ वाढती आहे. रस्त्यावरील खड्डे दूरून दिसून येत नाहीत. अचानक ब्रेक दाबल्यामुळे किरकोळ अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.
                           – राजू सावळे, जुनी सांगवी

हेही वाचा 

Back to top button