वालचंदनगर : पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील कंपनी कामगारांच्या गेल्या 42 दिवसांपासून सुरू असलेल्या संपावर मंगळवारी (दि. 2) तोडगा निघाला असून, गुरुवार (दि. 4) पासून कंपनी पुन्हा सुरळीत सुरू होणार आहे. हा संप मिटविण्यासाठी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुढाकार घेऊन मंत्रालयात बैठक लावून कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढला.
वालचंदनगर कंपनीतील 630 कामगारांनी थकीत देणी व वेतनवाढीचा रखडलेला करार तातडीने व्हावा या मागणीसाठी गेल्या 42 दिवसांपासून संप पुकारला होता. कामगारांचा प्रश्न मिटवण्यासाठी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुढाकार घेत मंगळवारी मंत्रालयामध्ये कामगारमंत्री सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली.
या बैठकीबाबत माहिती देताना हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, कंपनीकडे कामगारांची 7 कोटी 84 लाख रुपयांची देणी थकीत असून, यातील 40 टक्के देणी सात दिवसांमध्ये देण्याचे ठरले असून उर्वरित 30 टक्के रक्कम फेब—ुवारी महिन्यात व राहिलेली 30 टक्के रक्कम मार्च महिन्यापर्यंत देण्याचे ठरले आहे. यासह वेतनवाढीचा रखडलेला करार 28 फेब—ुवारी 2024 पर्यंत करण्यात येणार आहे. प्रामुख्याने कामगारांना वेतनवाढीचा करार रखडलेल्या कालावधीतील 12 ते 15 महिन्यांचा फरक मिळणार आहे. याशिवाय संपाच्या कालावधीमध्ये कंपनीने केलेली कारवाई कंपनी मागे घेणार असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
या बैठकीला कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक चिराग दोशी, व्हाईस प्रेसिडेंट धीरज केसकर, संजय गायकवाड, आयएमडी कामगार समन्वय संघाचे अध्यक्ष कपिल गायकवाड, सचिव शहाजी दबडे, भारतीय मजूर संघाचे अध्यक्ष राहुल बावडेकर, शरद हनुमंते तसेच कामगार विभागातील सचिव, आयुक्त आदी उपस्थित होते.