आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट स्पर्धेसाठी सात मराठी चित्रपटांची निवड | पुढारी

आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट स्पर्धेसाठी सात मराठी चित्रपटांची निवड

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामधील (पिफ) आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट स्पर्धेसाठी सात मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. ‘वल्ली’ (दिग्दर्शक – मनोज शिंदे), स्थळ (दिग्दर्शक – जयंत दिगंबर सोमलकर), ‘भेरा’ (दिग्दर्शक – श्रीकांत प्रभाकर), ‘श्यामची आई’ (दिग्दर्शक – सुजय डहाके), ‘नाळ भाग 2’ (दिग्दर्शक – सुधाकर रेड्डी यक्कंटी), ‘छबिला’ (दिग्दर्शक – अनिल अमृत भालेराव) आणि ‘जिप्सी’ (दिग्दर्शक – शशि चंद्रकांत खंदारे) या सात चित्रपटांची निवड केली आहे.

महोत्सवातील आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभागातील या चित्रपटांची घोषणा महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी मंगळवारी (दि.2) केली. 18 ते 25 जानेवारी या कालावधीत होणार्‍या महोत्सवात मराठी चित्रपटांच्या स्पर्धेचे परीक्षण आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्युरी करतात. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटाला पाच लाख रुपयांचा महाराष्ट्र शासनाचा संत श्रीतुकाराम पुरस्कार दिला जातो. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट पटकथा आणि छायाचित्रकाराला प्रत्येकी 25 हजार रुपयांचे पुरस्कार दिले जातात.

पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन (सहा पडदे), लष्कर परिसरातील आयनॉक्स (तीन पडदे) आणि औंध भागातील वेस्टएंड मॉलमधील सिनेपोलिस चित्रपटगृहात (दोन पडदे) या तीन ठिकाणी एकूण 11 पडद्यांवर चित्रपट दाखविले जाणार आहेत.

महोत्सवात दरवर्षी निवडले जाणारे मराठी चित्रपट महाराष्ट्राच्या विविध भागांतील युवकांनी तयार केलेले असतात. ते आंतरराष्ट्रीयस्तरावर यशस्वी होतात, असा अनेक वर्षांचा अनुभव असून, याहीवर्षी ही परंपरा कायम राहील.

– डॉ. जब्बार पटेल, संचालक, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव.

हेही वाचा

Back to top button