फेलोशिपसाठी संशोधक आक्रमक; सारथी कार्यालयासमोर आंदोलन | पुढारी

फेलोशिपसाठी संशोधक आक्रमक; सारथी कार्यालयासमोर आंदोलन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बार्टी प्रशासनाने ज्या प्रकारे सीईटी परीक्षा रद्द करून सरसकट फेलोशिप नोंदणी दिनांकापासून देण्याचे घोषणापत्र जाहीर केले, त्याचप्रमाणे सारथी प्रशासनानेसुद्धा 10 जानेवारी रोजी होणारी सीईटी परीक्षा रद्द करून सरसकट फेलोशिप नोंदणी दिनांकापासून देण्यात यावी, या मागणीसाठी सारथी संशोधक विद्यार्थ्यांनी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते सारथी कार्यालयात आक्रमक झाले असून, व्यवस्थापकीय संचालकांच्या दालनात ठिय्या मांडला आहे.

महाराष्ट्रातून सारथी संशोधक विद्यार्थ्यांनी सारथी कार्यालय पुणे येथे याबाबत आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत सारथी प्रशासनाकडून 10 जानेवारी रोजी होणारी सीईटी परीक्षा रद्द करून 2023 च्या बॅचला सरसकट फेलोशिप नोंदणी दिनांकापासून देण्याचे घोषणापत्र मिळत नाही तोपर्यंत विद्यार्थी मागे हटणार नाहीत, असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे. कोल्हापूर, पुण्यासह राज्यभर आंदोलने, साखळी उपोषणे सुरू आहेत. सारथी, बार्टी व महाज्योती या तीनही संस्थांना समान न्याय असावा, असे शासनाचे धोरण असताना बार्टीला वेगळा न्याय व सारथीला वेगळा न्याय कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करीत विद्यार्थी बेमुदत ठिय्या आंदोलनाला बसलेले आहेत.

स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांच्या दालनात गोंधळ घातल्यानंतर तेथील फाइल्स व संगणक हलविण्यात आले. पोलिस प्रशासनाने कार्यकर्त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. या आंदोलनावेळी स्वराज्यचे उपाध्यक्ष रघुनाथ चित्रे, राजू फाले, प्रतीक साखरे, विजय जरे, प्रवीण भोसले, विक्रम कदम, द्वारकेश जाधव, अजित बाबळसुरे, रोहित शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. जाधव म्हणाले, ’शासन सारथी, बार्टी व महाज्योतीला समान न्याय देण्याची भूमिका घेते. मग अधिकारी त्या निर्णयाचे पालन का करीत नाहीत? जमत नसेल तर खुर्ची सोडावी; अन्यथा स्वराज्य पक्ष विद्यार्थ्यांसाठी संघर्ष करायला तयार आहे.’

हेही वाचा

 

Back to top button