Nashik Corona Update : शहरात कोरोनाबाधितांचा आकडा पाचवर | पुढारी

Nashik Corona Update : शहरात कोरोनाबाधितांचा आकडा पाचवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; शहरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. कोरोनाबाधितांचा आकडा आता पाचवर गेला आहे. ‘थर्टी फर्स्ट’च्या निमित्ताने पर्यटनासाठी शहराबाहेर गेलेले नागरिक कोरोनाचे वाहक असण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी अशा पर्यटनवारी करणाऱ्यांवर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. सर्दी, खोकला असणाऱ्या रुग्णांनी ॲन्टिजेन चाचणी करून घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

तब्बल दीड, पावणेदोन वर्षांच्या विश्रांतीनंतर नाशिक शहरात पु्न्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. केरळपाठोपाठ महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. आता जिल्ह्यातील ग्रामीण भागापाठोपाठ शहरातील कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे नाशिक महापालिका अलर्ट मोडवर आली आहे. शहरात सर्दी, खोकला झालेल्या जवळपास साडेपाचशेहून अधिक रुग्णांच्या रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यात पाच जण पॉझिटिव्ह आढळले.

कोरोना सामना करण्यासाठी राखीव बेड, आॅक्सिजन व्यवस्था तसेच औषधसाठा सज्ज ठेवण्यात आला आहे. सद्यस्थितीत महापालिकेकडे एकूण बेड ७,३५३ असून, आयसीयू बेड ५३३ आहेत. पन्नास हजार पीपीई किट, एक लाख ७८ हजार ॲन्टिजेन किट, एक हजार आरटी-पीसीआर किट, एन- ९५ मास्क एक हजार, तर १६५ व्हेंटिलेटर व तीन हजार जम्बो सिलिंडर सज्ज ठेवण्यात आले आहेत. डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ३० किलोलिटरचे प्रत्येकी दोन, तर तीन किलोलिटरचा लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) प्लान्ट आहे. नाशिकरोडच्या ठाकरे रुग्णालयात २० किलोलिटर व तीन किलोलिटरचे एलएमओ प्लान्ट आहे. महापालिकेकडे १८२० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहेत.

एक रुग्णालयात, तर चौघे क्वारंटाइन

शहराततील पाच रुग्णांपैकी एका महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे. उर्वरित चारही रुग्णांना फारसा त्रास जाणवत नसल्यामुळे त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. गेल्या पाच दिवसांत ५४२ रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आल्या, तर सतरा आरटी-पीसीआर चाचण्या करण्यात आल्या, अशी माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी दिली.

येवल्यातील ‘तो’ रुग्ण कोरोनाबाधित

येवला तालुक्यातील कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना १७ डिसेंबरला घडली. त्याचे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, जिल्ह्यात मंगळवारी (दि.२) सायंकाळपर्यंत तीन कोरोनाबाधितांवर उपचार सुरू होते. तर १३ संशयितांचा अहवाल प्रलंबित आहे.

येवला तालुक्यातील पुरुष रुग्णाचा खासगी रुग्णालयात १७ डिसेंबरला मृत्यू झाला होता. त्याचा अहवाल सोमवारी (दि.१) मिळाल्यानंतर तो कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्यात मंगळवारी तिघा बाधितांवर उपचार सुरू होते. त्याचप्रमाणे मंगळवारी २० आरटी-पीसीआर व ७८० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून, त्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी जिल्ह्यात २ हजार २६४ खाटांची तरतूद करण्यात आली आहे. त्यात ५६१ आयसीयू बेड व ३०८ व्हेंटिलेटर बेड आणि १ हजार ४४४ ऑक्सिजन व्यवस्था असलेले बेड उपलब्ध आहेत.

हेही वाचा :

Back to top button