Crime News : दागिने घडविणार्‍या पेढीतून तीन कोटी 32 लाखांचा ऐवज चोरी | पुढारी

Crime News : दागिने घडविणार्‍या पेढीतून तीन कोटी 32 लाखांचा ऐवज चोरी

पुणे : सराफ बाजारातील दागिने घडविणार्‍या एका पेढीतून चोरट्यांनी पाच किलो सोने, तसेच दहा लाख 93 हजारांची रोकड असा तीन कोटी 32 लाख नऊ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. चावी चोरी करून हा डल्ला मारल्याचा संशय आहे. याप्रकरणी काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. याबाबत दीपक माने (वय 39, रा. साई कॉर्नर, रास्ता पेठ) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 31 डिसेंबर 2023 ते 1 जानेवारी 2024 या कालावधीत रविवार पेठेतील राज कास्टिंग या दुकानात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराफ पेढीतील कारागिरांनी दागिने आणि रोकड चोरल्याचा संशय माने यांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रविवार पेठेत माने यांची राज कास्टिंग पेढी आहे. या पेढीत दागिने घडवून त्याची विक्री सराफ बाजारातील पेढींना केली जाते. नववर्षाच्या गडबडीत माने होते. त्यांनी पेढीत पाच किलो सोने, तसेच दहा लाख 93 हजारांची रोकड ठेवली होती. रविवारी (31 डिसेंबर) मध्यरात्री पेढीतील कारागिरांनी सोने, तसेच रोकड असा तीन कोटी 32 लाख नऊ हजार 228 रुपयांचा ऐवज चोरून नेला, असे माने यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

आरोपींचा शोध सुरू

पेढीतून सोने आणि रोकड चोरीचा प्रकार सोमवारी (1 जानेवारी) उघडकीस आला. त्यानंतर माने यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा, सहायक निरीक्षक वैभव गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पेढीतील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले असून, पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. सहायक निरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.

हेही वाचा

Back to top button