जिल्ह्यात कुणबीच्या अडीच लाख नोंदी; खेड आणि जुन्नर तालुक्यांमध्ये सर्वाधिक | पुढारी

जिल्ह्यात कुणबीच्या अडीच लाख नोंदी; खेड आणि जुन्नर तालुक्यांमध्ये सर्वाधिक

पुणे : पुणे व पिंपरी- चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुमारे 2 लाख 57 हजार कुणबी नोंदी सापडल्या आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील खेड आणि जुन्नर तालुक्यांमध्ये सर्वाधिक नोंदी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नोंदी शोधण्यासाठी आतापर्यंत विविध 13 प्रकारच्या दस्तांमधून सुमारे 30 लाखांहून अधिक नोंदी तपासण्यात आल्या आहेत. त्यात सरसकट कुणबी नोंदी पडताळणी सुरू करण्यापूर्वीच्या दहा महिन्यांच्या कालावधीत पुणे जिल्ह्यात 12 हजार 254 कुणबी दाखले वितरित करण्यात आले होते.

महसूल विभागाकडील दप्तरांमधून मराठा कुणबी नोंदी पडताळणी करण्याचा आदेश राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. या आदेशानुसार पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सर्व तालुक्यांत तालुकास्तरीय कागदपत्रे पडताळणीसाठी समित्या स्थापन केल्या आहेत. समित्यांकडून कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. पडताळणीत सन 1967 पूर्वीच्या नोंदी पडताळण्यात येत आहेत. जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये सर्वसमावेशक नोंदी सापडत आहेत. शाळांचे दाखले, जन्म- मृत्यूच्या नोंदींमध्ये कुणबी नोंदींचे मोठे प्रमाण दिसून येत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यात आतापर्यंत सापडलेल्या मराठा कुणबी, कुणबी मराठा अशा नोंदी जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर प्रत्येक तालुकानिहाय अपलोड करण्यात आले आहेत. मात्र, बारामती तालुका आणि पिंपरी-चिंचवड या दोन ठिकाणांच्या नोंदींबाबत संकेतस्थळावर कुठलीच माहिती प्राप्त होत नसल्याचे दिसून येत आहे. अद्याप याबाबत कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने दोन्ही ठिकाणच्या स्थानिकांना नोंदी शोधण्यासाठीचा पर्यायच खुला नसल्याने तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तर याबाबत राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान (एनआयसी) विभागाकडून तांत्रिक बिघाड असल्याचे कारण देत तातडीने दुरुस्ती केली जाईल, असे सांगण्यात आले.

हेही वाचा

Nashik News : भाजप ओबीसी मोर्चाची आज विभागीय बैठक

घटना पूर्वनियोजित; दहशत माजविण्याचा प्रयत्न : अमल महाडिक

चरबी वितळवून तूप बनवणारे रॅकेट उद्ध्वस्त

 

Back to top button