Pimpri : भेसळयुक्त मिठाईकडे एफडीएचे होतेय दुर्लक्ष | पुढारी

Pimpri : भेसळयुक्त मिठाईकडे एफडीएचे होतेय दुर्लक्ष

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : भेसळयुक्त मिठाईबाबत सध्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून (एफडीए) जुजबी स्वरुपाची कारवाई केली जात आहे. दिवाळी सणाच्या वेळी म्हणजे महिनाभरापूर्वी खवा, दूध, मिठाई, पनीर आदींच्या भेसळीबाबत कारवाई करण्यात आली होती. सण-उत्सवादरम्यान कठोर कारवाई करणार्‍या एफडीएचे अन्य वेळी मात्र दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

कारवाईकडे दुर्लक्ष

दूधापासून बनविलेला खवा, आणि त्या खव्यापासून पेढा, बर्फी यासारखे अनेक मिठाईचे प्रकार बनविले जातात. परंतु, ऐन सणासुदीच्या काळात वाढलेली मिठाईची मागणी लक्षात घेऊन मिठाई विक्रेत्यांकडून भेसळयुक्त वा बनावट खव्यापासून बनविलेली मिठाई ग्राहकांच्या घशात घालण्याचा प्रयत्न होतो. बाजारात असलेली मिठाई शुद्ध खव्यापासूनच बनविलेली असेल याची कोणतीही शाश्वती नाही. खव्याचे प्रमाण कमी करून त्यात अन्य प्रकारचे पीठ व रासायनिक पदार्थ वापरून भेसळयुक्त मिठाई बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. बनावट खवा बनविणारे परप्रांतिय असल्याचे सांगितले जाते. मिठाई दुकानदार त्यांच्याकडून खवा विकत घेतात आणि त्यापासून मिठाई बनवून विक्री करतात.

भेसळयुक्त मिठाई नसते चविष्ट

भेसळयुक्त मिठाई शुद्ध खव्यापासून न बनविता, अर्ध्या प्रमाणात खवा, त्यात मैदा व अन्य पीठ वापरले जाते. त्यात काही रासायनिक पदार्थही वापरले जातात. त्यामुळे त्यात खव्याप्रमाणे चिकटपणा येऊ शकेल. तसेच साखरेचे प्रमाण मात्र बनावट खव्यात बिघडते. त्यामुळे भेसळयुक्त मिठाई चविष्ट राहत नाही.

भेसळयुक्त मिठाईबाबत दिवाळीच्या सुमारास कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी खवा, दूध, मिठाई, पनीर, तेल, तूप आदींचे नमुने घेण्यात आले होते. मिठाईत भेसळ झाल्याची तक्रार आल्यास त्याबाबत कारवाई करण्यात येते.

– सुरेश अन्नापुरे, सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, पुणे

हेही वाचा

Back to top button