कलाकारही गिरवताहेत भाषांचे धडे | पुढारी

कलाकारही गिरवताहेत भाषांचे धडे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अमित हा विविध कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळतो… आपल्या या कामासाठी हिंदी आणि मराठी भाषांचे शिक्षण आवश्यक आहे, याचे महत्त्व त्याला उमगले आणि तो हिंदी आणि उर्दू भाषांच्या शिक्षणाकडे वळला आहे. अमितप्रमाणे आज अनेक नवोदित कलाकार भाषा शिक्षणाकडे वळले असून, खासकरून नवोदित सूत्रसंचालक, व्हाइस ओव्हर आर्टिस्ट, नाट्य कलाकार, गायक, लेखक हे भाषा शिक्षणावर भर देत आहेत. संस्कृत, हिंदी, मराठी, उर्दू, इंग्रजी, बंगाली, गुजराती आदी भाषा ते शिकत असून, कलाकार अनेक भाषातज्ज्ञांकडून भाषिक शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. त्यासाठी पुण्यातील काही भाषातज्ज्ञ ऑनलाइन – ऑफलाइनद्वारे वर्ग घेत असून, या वर्गांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

भाषिक ज्ञान वाढावे, ती भाषा बोलण्याची पद्धत आणि लहेजा अवगत व्हावा, भाषेचे व्याकरण आणि शब्दांचे उच्चार कळावेत, त्यातील बारकावे कळावेत यासह भाषांमधील लेखनाची पद्धत उलगडावी, यासाठी कलाकार भाषा शिक्षणाला महत्त्व देत आहेत. आपण ज्या भाषेत करिअर करत आहोत, ती भाषा उत्तमरीत्या ज्ञात व्हावी, भाषेची ऐतिहासिक पार्श्वभूमी, कला क्षेत्रातील ती वापरली जाण्याची पद्धत अवगत करण्यासाठी कलाकार भाषांचे शिक्षण घेत आहेत. कलाकारांसाठी भाषातज्ज्ञ आठवड्यातून दोनदा ऑनलाइन-ऑफलाइन वर्ग घेत आहेत.

खासकरून सूत्रसंचालक, एकपात्री कलाकार, मालिकेतील कलाकार, चित्रपटातील कलाकार आदी कलाकारांचा भाषा शिक्षणाकडे कल वाढला आहे. अधिकृत संकेतस्थळ, फेसबुक-इन्स्टाग्राम लाईव्ह आणि विविध मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्सद्वारे भाषातज्ज्ञ ऑनलाइन वर्गही घेत आहेत. याविषयी राज देशपांडे म्हणाला, मी विविध कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन करतो. त्यासाठी विविध भाषांमध्ये मला सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडावी लागते. त्या – त्या भाषेचा लहेजा, शब्द उचारण्याची पद्धत अवगत व्हावी, म्हणून मी भाषिक शिक्षणाकडे वळलो आहे. मी हिंदी भाषेतील शब्द उच्चारणाची पद्धत, लेहजा, त्यातील व्याकरण अशा विविध गोष्टींची माहिती घेत आहे, याचा मला उपयोग
होत आहे.

कलाकार ज्या कला-सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत त्या क्षेत्रात भाषिक शिक्षणाला खूप महत्त्व आहे. भाषेतील व्याकरणापासून ते भाषा बोलण्याची पद्धत, लहेजा…त्यातील शब्दांचे उच्चार आणि भाषेचे महत्त्व…असे सारे काही कलाकारांना माहिती असायलाच हवे. त्यामुळेच याचे महत्त्व जाणत अनेक कलाकार भाषा शिक्षणाकडे वळले आहेत. त्यांच्यासाठी मी वर्ग घेत आहे. मी कलाकारांना हिंदी, मराठी, इंग्रजी अशा काही भाषा शिकवत आहे आणि त्याला कलाकारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मंजिरी धामणकर, भाषातज्ज्ञ आणि कलाकार

हेही वाचा

Back to top button