अखेर ‘रिंग रोड’ बाधितांना दरवाढ ; आंदोलनाला यश | पुढारी

अखेर ‘रिंग रोड’ बाधितांना दरवाढ ; आंदोलनाला यश

शिवनेरी : पुढारी वृत्तसेवा :  रिंग रोडबाधित शेतकर्‍यांना आता हेक्टरी जास्तीत जास्त पाच लाख वाढीव दर मिळणार आहे. आतापर्यंत ज्या शेतकर्‍यांना पैसेवाटप झाले त्यांनादेखील या वाढीव दरवाढीचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, आता जिल्हा प्रशासनाने पुन्हा संमतीपत्र सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदत वाढ दिली असून, त्यानंतर मुदत वाढ मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेले दर कमी असल्याने शेतकर्‍यांनी दरवाढीसाठी आंदोलन केले. शेतकर्‍यांच्या या आंदोलनाला अखेर यश आले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पुणे व पिंपरी- चिंचवडमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी 172 किलोमीटरचा, 110 मीटर रुंदी असलेला रिंग रोड उभारण्याचे ठरविले आहे. खेड तालुक्यातील रिंग रोडबाधित शेतक-यांनी अपेक्षित दर न मिळाल्याने प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले होते.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मध्यस्थी करून थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली व जिल्हा समितीला दरवाढी संदर्भात फेरआढावा घेण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा समितीने आढावा घेऊन ही नवीन दर वाढ जाहीर केली.

जिल्हा समितीच्या निर्णयानुसार 1 जानेवारीपासून पुन्हा शेतक-यांना वाढीव दराने नोटिसा देण्यात येणार आहेत. यामध्ये आतापर्यंत ज्या शेतक-यांना पैसे वाटप करण्यात आले अशा शेतक-यांच्या बँक खात्यात वाढीव रक्कम परस्पर जमा करण्यात येणार आहे. यासाठी या शेतक-यांनी कार्यालयात जाण्याची गरजदेखील नाही. दरम्यान, आता 25 टक्के रकमेचा लाभ घेण्यासाठी अखेरची एक महिन्याची मुदत वाढ देण्यात आली असून, लवकरच वाढीव दरानुसार पैसेवाटप करण्यात येणार आहे.
                                                               -जोगेंद्र कट्यारे, खेड प्रांतधिकारी.

जिल्हा समितीने नव्याने जाहीर केलेले दरदेखील समाधानकारक नाही. समितीने दोन महिने केवळ वेळ काढूपणा करत शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. बाधित शेतक-यांना विश्वासात न घेता ही दरवाढ केली आहे.
                                                  – अमोल पवार, माजी सभापती व बाधित शेतकरी.

Back to top button