हिंजवडीचे माजी सरपंच विशाल साखरेंना मारहाण : मयूर साखरेंसह आठ जणांवर गुन्हा

हिंजवडीचे माजी सरपंच विशाल साखरेंना मारहाण : मयूर साखरेंसह आठ जणांवर गुन्हा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : हिंजवडीचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य विशाल साखरे यांना ग्रामपंचायत कार्यालयात घुसून बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी (दि. 28) घडली. याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य मयूर साखरे यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल लक्ष्मण साखरे (44, रा. हिंजवडी) असे मारहाण करण्यात आलेल्या माजी सरपंचाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ग्रामपंचायत सदस्य मयूर राजेंद्र साखरे, सूरज शिवाजी साखरे, राम नारायण साखरे, सुमित पांडुरंग साखरे, रोहित कृष्णा जांभुळकर (सर्व रा. हिंजवडी) आणि ओंकार रामदास मेमाणे (रा. मारुंजी) यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पौळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी ग्रामपंचायतची मासिक सभा सुरू होती. या वेळी सभेतील अजेंड्यावर ग्रामपंचायत व्यायाम शाळा हस्तांतरणाबाबतचा मुद्दा चर्चेसाठी आला. ही व्यायाम शाळा मयूर साखरे याचा भाऊ चालवत आहे. त्यामुळे व्यायाम शाळा ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण करण्यास त्याचा विरोध होता. या कारणावरून मयूर याने फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तसेच, तुला बघून घेतो, अशी धमकी देत तो सभेतून बाहेर निघून गेला.

दरम्यान, काही वेळाने मयूर हा त्याच्या साथीदारांना घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात घुसला. फिर्यादी यांना शिवीगाळ, दमदाटी करत बेदम मारहाण केली. त्या वेळी ग्रामपंचायत सदस्यांनी मध्यस्थी करत ही भांडणे सोडवली. दरम्यान, आरोपीने तू बाहेर ये तुला संपवतोच, अशी धमकी दिली. तसेच, जो मध्ये पडतोय त्यालाही बघून घेतो, असे म्हणत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हिंजवडी पोलिस तपास करत आहेत.

खोटी शपथ घेतल्याचा राग?

सरपंच पदाच्या निवडणुकीदरम्यान फिर्यादी विशाल साखरे यांनी आरोपी मयूर साखरे यांना मतदान करण्याबाबत शपथ घेतली होती. हिंजवडीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे आराध्य दैवत असलेल्या म्हातोबा महाराजांसमोर ही शपथ घेण्यात आली होती. मात्र, विशाल साखरे यांनी मयूर साखरे यांच्या विरोधात मतदान केले होते. त्यामुळे मयूर साखरे यांचे सरपंदपद थोडक्यात हुकले होते. याची खदखद मयूर साखरे गटात होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी दोन्ही गटांमध्ये सोशल वॉरदेखील सुरू होते. विशाल साखरे यांनी शपथ घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. या वादातूनच ही मारहाण केल्याची परिसरात चर्चा आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news