सोशल मीडियाच्या जगात मुक्तछंदातील कवितांना घसरण : कवी रमण रणदिवे | पुढारी

सोशल मीडियाच्या जगात मुक्तछंदातील कवितांना घसरण : कवी रमण रणदिवे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ‘अभिव्यक्तीचा कस लागावा असा साहित्यातील मोठा प्रकार म्हणजे काव्य होय. जीवनातील बर्‍या-वाईट अनुभवांच्या ठिणग्या होतात आणि त्या ठिणग्यांच्या कविता बनतात. सोशल मीडियाच्या जगात मुक्तछंदातील कवितांना घसरण लागली असून, आजची कविता छंदमुक्त झाली आहे,’ अशी टीका ज्येष्ठ कवी आणि गझलकार रमण रणदिवे यांनी केली. रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे मराठीतील आद्य शायर भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार प्रसिद्ध कवयित्री- गझलकार प्राजक्ता वेदपाठक यांना रणदिवे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

भाऊसाहेब पाटणकर यांच्या जन्मदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद आडकर, अभिनेते- दिग्दर्शक किरण यज्ञोपवित, कवी नितीन केळकर, भाऊसाहेब पाटणकर यांचे नातू केदार पाटणकर आदी उपस्थित होते. रणदिवे म्हणाले, ‘मुक्तछंदातील कवितेची जी स्थिती आज झाली आहे तशीच स्थिती गझलेचीही झाली आहे. कविता हा आपल्या आयुष्याचा एक भाग असतो. आयुष्याच्या कल्पवृक्षाला शाश्वताची फळे ही कलेतूनच फुटतात.’

तर सत्काराला उत्तर देताना वेदपाठक यांनी ‘मी कवितेला काय दिले हे मला माहीत नाही, पण कवितेने मला माझ्या मोठ्या दु:खातून सावरण्याची ताकद दिली. कविता हा आत्म्याशी संवाद असतो. मित्र-मैत्रिणींच्या सहवासात माझी कविता बहरत गेली, समंजस होत गेली,’ अशी भावना व्यक्त केली. शिल्पा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आयोजित कविसंमेलनात मीरा शिंदे, ज्योत्स्ना चांदगुडे, प्रभा सोनवणे, प्रज्ञा महाजन, मिलिंद शेंडे, निरुपमा महाजन, सुजाता पवार आदींनी सहभाग घेतला.

 हेही वाचा

Back to top button