बळीराजा मुदत कर्ज योजना; जिल्हा बँकेकडून शेतकर्‍यांना थेट कर्जपुरठा | पुढारी

बळीराजा मुदत कर्ज योजना; जिल्हा बँकेकडून शेतकर्‍यांना थेट कर्जपुरठा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शेतकरी सभासदांना त्यांच्या शेतीआनुषंगिक खर्चासह तत्काळ पैशाची गरज पूर्ण करण्यासाठी बळीराजा मुदती कर्ज योजना कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (पीडीसीसी बँक) अध्यक्ष प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी दिली. तसेच केंद्र सरकार व राज्य सरकारमार्फत अनुदान व व्याज सवलतींच्या पाच प्रमुख योजनांना प्रकल्पनिहाय 40 लाख रुपये मर्यादेत थेट कर्जपुरवठा करण्यास सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा बँकेत शुक्रवारी (दि. 29) बँकेने सुरू केलेल्या नवीन योजना आणि नोव्हेंबर 2023 अखेरच्या आर्थिक स्थितीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत दुर्गाडे यांच्यासह बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांच्यासह अधिकार्‍यांमध्ये उपसरव्यवस्थापक संजय शितोळे, सहाय्यक सरव्यवस्थापक समीर रजपुत, संजय वाबळे, सुधीर पाटोळे, गिरीश जाधव आदी उपस्थित होते. ते म्हणाले, ’बळीराजा योजनेत विकास संस्थांमार्फत कर्जदार सभासद शेतकर्‍यांना प्रतिएकरी दीड लाख रुपये व सात लाख रुपये मर्यादित रकमेचा कर्जपुरवठा साडेदहा टक्के दराने करण्याच्या नवीन योजनेचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा.

केंद्राच्या पंतप्रधान रोजगारनिर्मिती योजनेत कृषी व पूरक सेवा, प्रक्रिया उद्योग तसेच मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, कृषी पायाभूत सुविधा निधी, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ योजनेंतर्गत कर्जपुरवठा सुरू करण्यात आला आहे. बँकेने 165 कोटींचे गृह कर्ज आणि 122 कोटींचे शैक्षणिक कर्जवाटप केले आहे. दरम्यान, नोटबंदीच्या काळातील राज्यातील आठ बँकांचे 101 कोटी रुपये बदलून मिळणे बाकी असून, त्यामध्ये पुणे जिल्हा बँकेच्या 22 कोटींचा समावेश आहे. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन प्रस्ताव दिल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा

Back to top button