

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे हे मुंबईत येण्यापूर्वीच मराठा समाजाला आरक्षण देऊ. त्यामुळे जरांगे यांना मुंबईत येण्याची गरज पडणार नाही, अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली. जरांगे हे 22 जानेवारीला मुंबईत मोर्चा काढणार आहेत. त्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर ते बोलत होते.
भारत न्याय यात्रेला प्रतिसाद मिळणार नाही
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेविषयी विचारले असता मंत्री मुश्रीफ म्हणाले, भारत जोडो यात्रेनंतरही पाच राज्यांच्या निवडणुकीत काहीही फरक पडला नाही. काँग्रेसला त्याचा काहीही फायदा झाला नाही. त्यामुळे भारत न्याय यात्रेलाही देशातील जनता प्रतिसाद देणार नाही.
गुन्हा दाखल झाला तरी चालेल…
कोल्हापुरात पापाची तिकटी येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक साकारण्यात आले आहे. त्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच उद्घाटन केल्याचा आरोप करून लोकप्रतिनिधींवर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केल्याकडे लक्ष वेधले असता पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज ही माझी दैवतं आहेत. छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. मला तेथे जाणे अत्यावश्यक होते. त्यामुळे उद्घाटनावरून माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरीही चालेल.