

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पायाचा चौथरा बांधण्यात आला आहे. एकूण 37 टक्के काम झालेले असताना आता पुतळा इतर ठिकाणी उभारण्याचा निर्णय महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी घेतला आहे. बोर्हाडेवाडी, मोशी येथील विनायकनगर येथे 140 फूट उंच छत्रपती संभाजी महाराज तसेच, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. त्याच्या चौथर्याच्या कामाची निविदा सन 2019-20 मध्ये राबविण्यात आली.
हे काम धनेश्वर कन्स्ट्रक्शन हे ठेकेदाराला देण्यास स्थायी समितीने जानेवारी 2020 ला मंजुरी दिली. एकूण 12 कोटी 50 लाखांच्या या कामाची वर्कऑर्डर 16 मार्च 2020 ला देण्यात आली. कामाची मुदत दीड वर्षे होती. वेळेत काम न झाल्याने ठेकेदाराला 31 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आतापर्यंत एकूण 37 टक्के काम पूर्ण झाले आहे. तसेच, छत्रपती संभाजी महाराज व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पुतळा बनविण्याचे काम दिल्ली येथे प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार हे करीत आहेत.
छत्रपती संभाजी महाराजांचा 100 फूट उंचीचा कांस्य धातूचा पुतळा असणार आहे. त्यासाठी 32 कोटी 66 लाख खर्च अपेक्षित आहे. त्याला स्थायी समितीने जून 2020 ला मंजुरी दिली आहे. पुतळ्याच्या 40 फूट उंचीच्या चौथर्याचा खर्च 12 कोटी 50 लाख इतका आहे. तसेच, त्या ठिकाणी संभाजी सृष्टी उभारून आकर्षक विद्युत व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठी सुमारे 15 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या स्मारकाचा एकूण खर्च 60 कोटींपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.
प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार हे हा पुतळा दिल्ली येथे स्टेनलेस स्टिलमध्ये तयार करणार आहेत. बाहेरून तो कांस्य धातूचा असणार आहे. त्याचे भाग आणून तो येथे त्यांची जुळवणी करून उभारला केली जाईल. नियमित देखभाल व दुरुस्तीसाठी पुतळ्यामध्ये लिफ्ट असणार आहे. संभाजी महाराजांचा पुतळा 100 फूट उंचीचा असणार आहे. चौथरा धरून एकूण उंची 140 फूट असणार आहे. तर, सरसेनापती हंबीरराव मोहिते व मावळ्याचे पुतळे नियमित आकाराचे असतील. पुतळ्याभोवती संभाजी सृष्टी उभारण्यात येणार आहे. त्यात अद्ययावत ध्वनी यंत्रणा असणार आहे
दर्शनी भागात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी स्थळ बदल करण्यात आला आहे. मोशी आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात हा पुतळा उभारण्यात येत आहे. पुणे-नाशिक महामार्गावरून तो स्पष्टपणे दिसेल. जुन्या ठिकाणी चौथर्याचे काम झाले आहे. तो खर्च वाया जाणार नाही. तेथे दुसरे काही करण्यात येणार आहे. या प्रकरणात अधिकार्यांवर कारवाई करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही.
– शेखर सिंह, आयुक्त, महापालिका
हेही वाचा