सावधान ! मुलांमध्ये वाढले संसर्गजन्य आजाराचे प्रमाण; काय घ्याल काळजी? | पुढारी

सावधान ! मुलांमध्ये वाढले संसर्गजन्य आजाराचे प्रमाण; काय घ्याल काळजी?

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरात गेल्या काही दिवसांपासून थंडी वाढली असल्याने संसर्गजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. वातावरणातील वाढते प्रदूषणदेखील त्याला कारणीभूत आहे. लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला आणि ताप या आजाराच्या रुग्णांचे प्रमाण 20 ते 30 टक्क्याने वाढले आहे. त्याशिवाय, मुलांमध्ये अ‍ॅलर्जीची समस्यादेखील पाहण्यास मिळत आहे. शहरात गेल्या काही दिवसांमध्ये थंडी वाढल्याने संसर्गजन्य आजार वाढले आहेत. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, अंगावर पुरळ येणे, हातांच्या बोटांवर सूज येणे आदी लक्षणे सध्या रुग्णांमध्ये आढळून येत आहेत.

सध्याचे वातावरण विषाणूचा प्रादुर्भाव होण्यासाठी पोषक असल्याने संसर्गजन्य आजारांचे रुग्ण वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अशक्तपणा येणे, कोरडा खोकला, ताप, सर्दी या प्रकारची लक्षणे रुग्णांमध्ये आढळून येत आहे. त्याशिवाय, अ‍ॅलर्जीमुळे सर्दी, खोकला, तापाचे प्रमाण वाढत आहे. काही रुग्णांना खोकल्याचा त्रास पंधरा दिवसांपर्यंत जाणवत आहे.

‘फ्लू’ वाढण्याची कारणे

  •  विषाणूंसाठी पोषक वातावरण
  •  उन्हाळ्याच्या तुलनेत सूर्यप्रकाश कमी असतो.
  •  सूर्यप्रकाश कमी असल्याने विषाणू जास्त काळ टिकतात.
  •  प्रदूषण जास्त असल्याने संसर्ग वाढतो.
  •  ‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी

काय काळजी घ्याल ?

  •  गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरायला हवा.
  •  थंडीपासून स्वतःचा बचाव करावा.
  •  हातांची स्वच्छता बाळगावी.
  •  मुले आजारी असतील तर त्यांना शाळेत पाठवू नये.
  •  रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पूरक आहार घ्यावा.
  •  आहारात फळे, पालेभाज्या घ्यायला हव्या.

हेही वाचा

Back to top button