शेतकर्‍यांना मिळणार वन हद्दीतील गवत ; पण आहे ही अट | पुढारी

शेतकर्‍यांना मिळणार वन हद्दीतील गवत ; पण आहे ही अट

भोर : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यात यंदा पर्यन्यमान कमी असल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच पाळीव जनावरांना चार्‍याची कमतरता भासण्याची शक्यता असल्याने वनविभागाने त्यांच्या हद्दीतील गवत कापून नेण्याची मुभा शेतकर्‍यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. वनसंपत्तीला कोणतीही इजा न करता शेतकर्‍यांनी वनविभागातील गवत कापून घेऊन जावे, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे. “वन वणवे नियंत्रण वनसंपत्तीचे संरक्षण” या विषयावर भोर वनविभागाची बैठक उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या बैठकीस भोरच्या सहायक वनसंरक्षक शीतल राठोड, नसरापूर वनपरिक्षेत्र अधिकारी संग्राम जाधव, भोर वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत, वेल्हे वनपरिक्षेत्र अधिकारी गोविंद लुंगटे व सर्व वनकर्मचारी
उपस्थित होते.

या वेळी वणव्यांच्या नियंत्रणासाठी वनहद्दीत जाळपट्टे तयार करणे, वणवे नियंत्रणासाठी पथक तयार करणे, वणव्यामुळे होणार्‍या नैसर्गिक नुकसानीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे आदी विषयांवर चर्चा होऊन उपाययोजना करण्यास मान्यता देण्यात आली.
या वेळी यंदा दुष्काळीस्थितीमुळे शेतकर्‍यांच्या गुरांना चारा कमी मिळणार असून, वनहद्दीतील चारा उपलब्ध करून दिल्यास दुष्काळीस्थितीत शेतकर्‍यांना मदत होऊ शकेल, असा निर्णय घेण्यात आला. तसेच प्रत्यक्ष जनावरांना वनहद्दीत चारण्यासाठी न आणता गुरांसाठी वनहद्दीतील गवत नेण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नसरापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी संग्राम जाधव यांनी सांगितले, की वनांमधील गवतामुळे वणवे पेटण्यास मदत होते व गवतामुळे वणवे आटोक्यात आणणेदेखील शक्य होत नाही. शेतकर्‍यांना हे गवत कापण्यास परवानगी दिल्याने वणव्यांचे प्रमाणदेखील मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

वनहद्दीतील गवत कापताना अशी घ्या काळजी

  • कोणत्याही प्रकारे वनसंपत्तीचे नुकसान होणार नाही.
  • वनकर्मचार्‍यांच्या नियंत्रणाखालीच हे गवत कापावे.
  • शेतकर्‍यांनी गवत कापताना कोणत्याही प्रकारे वणवा लागणार नाही याची काळजी घ्यावी.
  • गवत सोडून इतर झाडांना कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Back to top button