गर्दी बघत होती..‘ती’ गुंडांशी भिडत होती ; पोलिस रणरागिणीचा रुद्रावतार | पुढारी

गर्दी बघत होती..‘ती’ गुंडांशी भिडत होती ; पोलिस रणरागिणीचा रुद्रावतार

अशोक मोराळे

पुणे : वेळ : रात्री अकराची…, ठिकाण : वडगावशेरी… रस्त्यावर बघ्यांची तोबा गर्दी… वाद मिटविण्यासाठी आलेल्या तिघांवर टोळक्याने कोयता, दगड आणि विटांनी प्राणघातक हल्ला केला. कोणीही मध्ये पडायला तयार नाही. पोलिस ठाण्यातील ड्युटी संपवून ती आपल्या घराकडे दुचाकीवरून निघाली होती. हा प्रकार पाहताच ‘ती’च्या वर्दीतील रणरागिणी जागृत झाली. तिने कोणताही विचार न करता थेट रस्त्यावर उतरून  कर्तव्य बजावत एका गुंडाला पकडून ठेवले. तिच्या आवाजाची जरब एवढी होती की, इतर आरोपींनी तेथून पळ काढला. मात्र, तिने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे 20 मिनिटांत चंदननगर पोलिसांनी सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या.
महिला पोलिस हवालदार सीमा वळवी असे या वर्दीतील रणरागिणीचे नाव आहे. वळवी या चंदनगर पोलिस ठाण्यात कर्तव्यावर आहेत. रविवारी दिवसभरातील आपली ड्युटी संपवून रात्री अकरा वाजता त्या दुचाकीवरून घरी निघाल्या होत्या. दिगंबरनगर वडगावशेरी येथे त्या पोहोचल्या असता, त्यांना रस्त्यावर वाद सुरू असल्याचे निदर्शनास आले. काही जण एकामेकांना लाथाबुक्क्यांनी मारत होते. वळवी यांनी मारहाण करणार्‍यांना दरडावले. त्या वेळी काही जणांनी तेथून पळ काढला.
दरम्यान, एका आरोपीने कोयता काढून तरुणावर वार केले. तर काही जणांनी दगड आणि विटांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. हा सर्व प्रकार वळवी यांच्यासमोर सुरू होता. एकट्या वळवी सर्वांना रोखण्याचा प्रयत्न करत होत्या. पळ काढल्यानंतर आरोपींना पकडता यावे म्हणून एका हाताने वळवी मोबाईलद्वारे चित्रीकरण करत होत्या, तर दुसरीकडे आपल्या आवाजाच्या धाकाने आरोपींना दरडावत होत्या.
दरम्यान हा सर्व प्रकार सुरू असताना, रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी  बघ्यांची भूमिका घेतली होती. वळवी यांच्या मदतील कोणीही आले नाही. मात्र, त्यांनी न घाबरता आपले पोलिसी कर्तव्य बजावणे सोडले नाही. आरोपींपैकी एकाने पाठीमागून येऊन समोरच्यावर कोयत्याने वार केले. त्यामध्ये दोघे तरुण जखमी झाले. वळवी यांनी कोयत्याने मारहाण करणार्‍या आरोपीपैकी एकाला धावत जाऊन पकडून ठेवले. त्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाबरोबरच आपल्या पोलिस ठाण्याला दिली.
काही मिनिटांत पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अवघ्या 20  मिनिटांत पोलिसांनी मारहाण करणार्‍या आरोपींना बेड्या ठोकल्या. दरम्यान, गेल्या वर्षीदेखील सिंहगड रोड पोलिसांच्या बीट मार्शलनी धुडघूस घालणार्‍या एकाला रस्त्याने पळवून चोप दिला होता. याबाबतचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला होता. त्या वेळी पुणेकरांनी पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक केले होते.
पोलिस हवालदार वळवी या कर्तव्य संपवून घरी निघाल्या होत्या. त्यांच्या निदर्शनास हा प्रकार येताच, त्यांनी रस्त्यावर उतरून एका गुंडाला पकडून ठेवले. त्यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे पुढील मोठा अनर्थ टळून अवघ्या वीस मिनिटांत आरोपींना पोलिसांनी पाठलाग करून पकडले.
राजेंद्र लांडगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चंदनगर पोलिस ठाणे 
हेही वाचा

Back to top button