नर्‍हे – आंबेगावमधील प्रकल्प : गुजरात सरकारकडून शिवसृष्टीसाठी 5 कोटी | पुढारी

नर्‍हे - आंबेगावमधील प्रकल्प : गुजरात सरकारकडून शिवसृष्टीसाठी 5 कोटी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा श्री शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने नर्‍हे – आंबेगाव येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीला गुजरात सरकारकडून 5 कोटी रुपयांची देणगी सुपूर्त करण्यात आली. महाराजा श्री शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त विनीत कुबेर यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडून मुख्यमंत्री निवासस्थानी विशेष निमंत्रितांच्या उपस्थितीत धनादेशाच्या स्वरूपात ही देणगी स्वीकारली. गुजरात राज्याचे वन व पर्यटनमंत्री मुलु बेरा, पर्यटन सचिव सौरभ पारधी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते संदीप जाधव आदी या वेळी उपस्थित होते.

याबद्दल माहिती देताना कुबेर म्हणाले, शिवसृष्टीच्या रूपाने महाराष्ट्रात साकारत असलेल्या ऐतिहासिक थीम पार्कला मदत करण्याची इच्छा गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी याआधीच व्यक्त केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी 5 कोटी रुपयांचा धनादेश प्रतिष्ठानला सुपूर्त करण्यात आला. या वेळी पटेल यांना शिवसृष्टीची संपूर्ण माहिती देण्यात आली आणि त्यांना शिवसृष्टीच्या भेटीसाठीचे निमंत्रण देण्यात आले. या देणगीचा उपयोग शिवसृष्टीच्या दुसर्‍या टप्प्याच्या कामासाठी करण्यात येणार आहे.

हेही वाचा

Back to top button