

येरवडा : पुढारी वृत्तसेवा : क्रीडामहर्षी मा. पंढरीनाथ तथा अण्णासाहेब पठारे यांच्या अमृतमहोत्सवी अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जन्मदिनानिमित्त, कै. राजाराम भिकू पठारे इनडोअर स्टेडियम, खराडी येथे लाल मातीतील जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार उपस्थित होते. या वेळी त्यांनी अण्णासाहेबांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले.
याप्रसंगी बोलताना पवार यांनी महाराष्ट्रातील पहिलवानांना घडविण्यामध्ये अण्णांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. अण्णासाहेबांना शुभेच्छा देण्यासाठी दिग्गज पै. महाबली सतपाल सिंग, डीवायएसपी राहुल आवारे, हिंदकेसरी अभिजित कटके, हिंदकेसरी दिनानाथ सिंह व पद्मश्री डीआयजी कर्तार सिंग इ. उपस्थित होते. त्यांना पंढरीनाथ पठारे यांच्या वतीने पोशाख, गौरवचिन्ह व रोख इनाम देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेसाठी संपूर्ण देशभरातून नामांकित मल्ल सहभागी झाले होते.
प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याने भारत केसरी मनजित खत्रीवर ढाक डावावर विजय मिळवला. दुसरी कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड व जागतिक विजेता इराणचा मिर्झा इराणी यांची कुस्ती बरोबरीत सुटली. तृतीय क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर यांच्यामध्ये बरोबरीत सुटली. चौथी कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळ याने पंजाब केसरी अजय कुमार याच्यावर घुटना डावावर विजया मिळवला.
पाचवी कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन सागर बिराजदार याची भारतीय नौदल दीपाल पुनिया यावर डंकी डावावर विजय मिळवला. सहावी कुस्ती कर्नाटक केसरी कार्तिक काटे याची राष्ट्रीय विजेता कौतुक ढाफळे याच्यावर एक लंगी डावावर विजय मिळवला. अशा एकूण 74 दिग्गज पहिलवनांच्या कुस्त्या लावण्यात आल्या. माजी आमदार बापूसाहेब पठारे, नगरसेवक महेंद्र पठारे, नगरसेवक महादेव पठारे, बबन तात्या पठारे, कुस्ती कोच विलास कंडरे, दिलीप पठारे, बापू वसंत पठारे, राहुल पठारे आदींचे योगदान लाभले.
हेही वाचा