Crime news : दागिने चोरणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात | पुढारी

Crime news : दागिने चोरणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा :  गर्दीमध्ये दागिने, रोख रक्कम, किमती वस्तू यांची चोरी करणाऱ्या टोळीस इंदापूर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरीस गेलेले साडेतीन तोळे सोन्याचे दागिन्यांसह चोरी करताना वापरलेली टोयाटो अर्बन क्रुझर कार असा 10 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी सागर सोनवणे (रा. तरटगाव, ता. इंदापूर) यांनी 20 डिसेंबर रोजी अमर ज्वेलर्स इंदापूर येथे साडेतीन तोळे वजनाचे मंगळसूत्र खरेदी करून पर्समध्ये ठेवले होते. त्या वेळी सराफ दुकानात गर्दी होती. गर्दीचा फायदा घेऊन अज्ञाताने हे मंगळसूत्र चोरी केल्याची फिर्याद सोनवणे यांनी दिली होती.

संशयिताबाबत काहीही पुरावा नसताना गुन्हे शोध पथकाने इंदापूर, टेंभुर्णी, कुर्डुवाडी, संभाजीनगर शहरांपर्यंतचे 100 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमे-यांचे फुटेज तपासून तांत्रिक माहितीवरून विश्वजित अर्जुन पवार (वय 21, रा. मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर), ज्योती दिगंबर पवार (वय 30, रा. कुर्मेफळ, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) आणि अनिता पारलेस काळे (वय 35, रा. वडीगोद्री, ता. अंबड, जि. जालना) यांनी केल्याचे तपासात निष्पन्न केले.

हे सर्व संशयित रविवारी (दि. 24) जेजुरी येथे भाविकांची गर्दी असल्याने चोरी करण्याच्या उद्देशाने आले असताना त्यांना अटक करून त्यांनी चोरी केलेले फिर्यादी यांचे साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र तसेच गुन्हा करतेवेळी वापरलेली टोयाटो अर्बन क्रुझर कार (एमएच 20 एफवाय 3383, किंमत 8 लाख रुपये) असा 10 लाख 15 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. यातील संशयित हे सराईत असून, त्यांनी पुणे, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, जालना, छत्रपती संभाजीनगर, छाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यात बर्‍याच ठिकाणी चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

ही कामगिरी अपर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिलीप पवार, सहायक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे, प्रकाश माने, ज्ञानेश्वर जाधव, माधुरी लडकत, सलमान खान, सुनिल कदम, संतोष दावलकर, नंदू जाधव, विशाल चौधर यांनी केली.

Back to top button