वादग्रस्त होर्डिंग जमीनदोस्त करा : अतिरिक्त आयुक्तांचे आदेश | पुढारी

वादग्रस्त होर्डिंग जमीनदोस्त करा : अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नियमांना तिलांजली देऊन टिळक चौकातील संभाजी पोलिस चौकीच्या मागे उभारण्यात आलेले होर्डिंग जमीनदोस्त करण्याचा प्रस्ताव तयार करा, असे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी क्षेत्रीय कार्यालयाला दिले आहेत. आता क्षेत्रीय कार्यालय या आदेशाची अंमलबजावणी करणार, की हे होर्डिंग वाचवण्यासाठी पुन्हा धडपड करणार, हे पहावे लागणार आहे.

संभाजी पोलिस चौकीच्यामागे तीन होर्डिंग एकत्र करून एकच मोठे होर्डिंग उभारण्यात आले होते. हा प्रकार उजेडात आल्यानंतर महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी या होर्डिंगवर जाहिरात प्रसिद्ध करण्यास बंदी घालून चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तसेच या प्रकरणात कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयातील तीन कर्मचार्‍यांना निलंबित केले होते. त्यानंतर होर्डिंग व्यावसायिकाने सलग होर्डिंग वेगवेगळे करून तीन होर्डिंग केले आहेत.

दरम्यान, या होर्डिंगवर कारवाई करण्याचे वरिष्ठांनी आदेश दिल्यानंतरही क्षेत्रीय कार्यालयाने किंवा आकाशचिन्ह व परवाना विभागाने आजवर कारवाई केली नाही. दुसरीकडे होर्डिंग वाचवण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयाने जागा वाटप नियमावलीला मूठमाती देत ही जागा संबंधित होर्डिंग व्यावसायिकाला 11 महिने मुदतीने भाड्याने देण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. यासंदर्भात दैनिक ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनी या होर्डिंगसंदर्भात इतर कोणताही प्रस्ताव सादर न करता, हे होर्डिंग पाडण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाला दिले आहेत. गेले पाच महिने कारवाईस टाळाटाळ करणारे क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी आता या आदेशाचे पालन करणार की पुन्हा होर्डींग वाचवण्यासाठी नवी शक्कल लढणार, हे पहावे लागणार आहे.

होर्डिंगसाठी संबंधित जागा 11 महिन्यांसाठी भाडेपट्ट्याने देण्याचा प्रस्तावर अद्याप आलेला नाही. मात्र, इतर कोणताही प्रस्ताव न पाठवता सदर होर्डिंग पाडण्याचा प्रस्ताव पाठवल्याचे आदेश क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्तांना दिले आहेत.

डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

हेही वाचा

Back to top button