दुर्दैवी ! आईसमोर चिमुरड्याचा डंपरखाली सापडून मृत्यू | पुढारी

दुर्दैवी ! आईसमोर चिमुरड्याचा डंपरखाली सापडून मृत्यू

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मुलगा व मुलीला दुचाकीवर घेऊन मंतरवाडीहून शहराच्या दिशेने येत असलेल्या महिलेच्या दुचाकीला भरधाव डंपरने धडक दिली. घटनेत दुचाकीवरील आठ वर्षीय चिमुरडा डंपरच्या चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, डंपरचालकाला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, संतप्त नातेवाइकांनी डंपरला आग लावली.
बालाजी कोंडीबा पोले (वय 30, रा. हवेली) असे ताब्यात घेतलेल्या डंपर चालकाचे नाव आहे.

तर, शौर्य सागर आव्हाळे (वय 8, रा. आव्हाळवाडी, हवेली) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चिमुरड्याचे नाव आहे. याबाबत अक्षय बाबासाहेब भाडळे (वय 26, रा. उरुळी देवाची) यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी (दि.27) दुपारी दोनच्या सुमारास मंतरवाडी कात्रज बायपास येथील एच. पी. पेट्रोलपंपाच्या बाजूला ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहीण कोमल, भाचा शौर्य व भाची तृणल असे दुचाकीवरून मंतरवाडी भागातून जात होते.

ते एच. पी. पेट्रोलपंप परिसरात आले असता पाठीमागून डंपरचालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी डंपरची दुचाकीला धडक बसली. जोरदार धडकेत दुचाकी रस्त्यावर कोसळली. त्या वेळी दुचाकीवर पाठीमागे बसलेला आठ वर्षीय चिमुरडा डंपरच्या चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर डंपरचालक मदत न करता पसार झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, घटनेनंतर संतापलेल्या नातेवाइकांनी डंपरला आग लावली. याप्रकरणी पुढील तपास करण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button