कोल्हापूर : लक्षतीर्थमधील अनधिकृत मशिदीवरून राडा | पुढारी

कोल्हापूर : लक्षतीर्थमधील अनधिकृत मशिदीवरून राडा

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : लक्षतीर्थ वसाहतीतील अनधिकृत मशीद आणि एका मदरशावर कारवाई करण्यासाठी गेलेले महापालिकेचे पथक कारवाई न करताच परतल्याने संतप्त हिंदुत्ववाद्यांनी बुधवारी महापालिकेत सुमारे सहा तास ठिय्या मारला. प्रशासनाशी चर्चेवेळी अधिकार्‍यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकारही घडला. अखेर प्रशासनाने कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. यामुळे लक्षतीर्थ वसाहत आणि महापालिका आवारात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

लक्षतीर्थ वसाहतीत मशीद आणि एका मदरशाचे बांधकाम अनधिकृत असल्याची तक्रार हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती. महापालिका प्रशासनाने पाहणी केल्यावर हे बांधकाम अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार बुधवारी पोलिसांच्या फौजफाट्यात या मशिदीवर कारवाईसाठी महापालिकेचे पथक गेले. त्या ठिकाणी ‘या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम होत नाहीत’ असा फलक लावण्यात आला होता. त्यामुळे पथक कारवाई न करताच परतले. हा प्रकार हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना समजताच ते महापालिका आवारात गोळा झाले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी करत तब्बल सहा तास महापालिका आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. प्रशासनाने कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, फुलेवाडी मुख्य रस्त्यापासून चौकाचौकांत बंदोबस्त असल्याने लक्षतीर्थ वसाहतीला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. महापालिकेतही मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

बांधकामे अनधिकृत; मग कारवाई का नाही?

लक्षतीर्थ वसाहतीत गुंठेवारीत काही ठिकाणी बांधकामे झाली आहेत. त्यातील वेगवेगळ्या ठिकाणी मशीद व मदरसा आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी त्यावर आक्षेप घेऊन 15 मे 2023 रोजी महापालिकेकडे तक्रार केली होती. अनधिकृत मशीद, मदरसा असल्याने कारवाईची मागणीही केली होती. त्यानंतर महापालिकेने अलीम अंजुमन मदरसा, सुन्नत जमात न्यास संस्था, डी वॉर्ड, रि.स.नं. 1350 गुंजुटे मळा यांना 2 ऑगस्ट रोजी नोटिसा बजावल्या होत्या. संबंधितांनी कागदपत्रे सादर केल्यानंतर बांधकामे अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच गुंठेवारी कायद्यांतर्गत पाठविलेला प्रस्तावही नामंजूर केला आहे; तरीही अनधिकृत बांधकामे पाडलेली नाहीत. परिणामी, अनधिकृत मशीद, मदरसा पाडावे, यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक होते.

महापालिकेच्या नगररचना विभागाने पुन्हा 30 नोव्हेंबर 2023 रोजी मशीद, मदरशाचे बांधकाम काढून घेण्यासाठी नोटीस बजावली. संबंधितांनी 26 डिसेंबर रोजी स्वतःहून मशीद, मदरसा बंद करून घेत असल्याचे महापालिकेला कळविले. मात्र, त्यानंतरही अनधिकृत बांधकाम हटविले नाही.

प्रार्थनास्थळांना कुलपे अन् अधिकारी हात हलवत परतले!

महापालिकेने लक्षतीर्थ वसाहतीमधील मशीद, मदरशाचे अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली. बुधवारी सकाळी पोलिस बंदोबस्त मिळाला. तत्पूर्वी, महापालिका अधिकारी आणि संबंधित मशीद, मदरशाचे प्रमुख यांची मंगळवारी बैठक झाली. त्यामध्ये मशीद, मदरशात धार्मिक कार्यक्रम करणार नाही आणि त्यासंदर्भातील फलक लावण्यात येईल, अशी ग्वाही मशीद, मदरशाच्या प्रमुखांनी दिली. त्यानंतर मशीद, मदरशाला त्यांनी कुलपे लावली. बुधवारी सकाळी सुमारे दीडशे पोलिस बंदोबस्तात महापालिकेच्या नगररचना विभागातील अधिकारी-कर्मचारी संबंधित लक्षतीर्थ वसाहतीत गेले. त्यावेळी मशीद, मदरसा बंद असल्याचे निदर्शनास आले. अधिकार्‍यांनी जागेवर पंचनामा केला आणि महापालिकेचे पथक कारवाई न करता हात हलवत माघारी परतले.

याबाबत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना त्याची माहिती समजली. त्यानंतर प्रमुख कार्यकर्ते दुपारी एकच्या सुमारास महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना भेटण्यास आले. त्यांनी आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या मारला. अनधिकृत मशीद, मदरशावर कारवाई केल्याशिवाय येथून जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली. अनधिकृत मशिदीवर कारवाई का केली नाही? कुणाचा राजकीय दबाव आहे का? अशी विचारणा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली. आंदोलनाची माहिती शहरात पसरताच काही वेळातच सुमारे दोनशपेक्षा जास्त हिंदुत्ववादी कार्यकर्ते महापालिकेत जमा झाले. त्यामुळे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला.

सात दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन

प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. के. मंजुलक्ष्मी यांनी अनधिकृत बांधकामे सील करण्यात येतील. कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच त्यासंदर्भात त्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने फलकही लावण्यात येईल, असे स्पष्ट केले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी महापालिकेकडून कारवाईची लेखी ग्वाही घेतली. महापालिकेने कारवाईचे लेखी आश्वासन दिले. दरम्यान, येत्या सात दिवसांत कारवाई न केल्यास तीव— आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासनाला हिंदुत्ववाद्यांनी दिला. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, नगररचना विभागाचे सहायक संचालक विनय झगडे, उपशहर रचनाकार रमेश मस्कर आदी उपस्थित होते. आंदोलनात रा. स्व. संघाचे अनिरुद्ध कोल्हापुरे, उदय भोसले, दीपक देसाई, बंडा साळोखे, कुंदन पाटील, गजानन तोडकर यांच्यासह इतरांचा समावेश होता.

संभाजी महाराज स्मारक उद्घाटनप्रकरणी गुन्हे दाखल करा

पापाची तिकटी येथे महापालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक साकारण्यात येत आहे. स्मारकाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. तरीही स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित लोकप्रतिनिधींवर हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. महापालिकेच्या वतीने येत्या सात दिवसांत नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले.

शहरातील अनधिकृत मशीद, मदरशांची माहिती द्या

शहरात काही ठिकाणी अनधिकृत मशिदी आणि मदरसे असण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी धार्मिक प्रशिक्षण दिले जात आहे. अशा सर्व मशिदींची 22 जानेवारीपर्यंत माहिती द्यावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी महापालिकेकडे केली आहे.

सहायक संचालक झगडे यांच्या अंगावर कार्यकर्ते धावले

महापालिकेत अधिकारी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची बैठक सुरू होती. हिंदुत्ववादी कार्यकर्ते नगररचना विभागाचे सहायक संचालक झगडे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत होते. मात्र, झगडे त्या प्रश्नांना गांभीर्याने घेण्याऐवजी हसत बगल देत होते. त्यामुळे कार्यकर्ते चांगलेच संतापले. त्यांनी झगडे यांना धारेवर धरले. काही कार्यकर्ते झगडे यांच्या अंगावर धावून गेले. इतर कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांनी त्यांना अडविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

Back to top button