क्षेत्र नारायणपूर येथील दत्तजयंती सोहळ्याची सांगता | पुढारी

क्षेत्र नारायणपूर येथील दत्तजयंती सोहळ्याची सांगता

सासवड : पुढारी वृत्तसेवा : श्री क्षेत्र नारायणपूर (ता. पुरंदर) येथे पोपट महाराज (स्वामी) यांच्या अधिपत्याखाली तीन दिवसांचा अभूतपूर्व दत्तजयंती सोहळा पार पडला. मंगळवारी (दि. 26) सकाळी चंद्रभागा कुंडावर ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे मुखवटे व पादुका यांना चंद्रभागास्नान, अभिषेक व पुष्पवृष्टी करून सोहळ्याची सांगता झाली. मंगळवारी पहाटे 4 वाजता नारायणेश्वर (महादेव) आणि दत्त मंदिरात रुद्राभिषेक करण्यात आला. त्यानंतर पूर्णिमा हवन, आरती होऊन पालखी ग्रामप्रदक्षिणेला सुरुवात झाली. दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. चंद्रभागा कुंडावर ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे मुखवटे व पादुका यांचा दही, दूध, पंचामृताचा अभिषेक व चंद्रभागास्नान कन्याकुमारीचे दीपक पारोळ, विजय सूर्यवंशी, तात्यासाहेब भिंताडे, विजय पुरंदरे, अजयसिंह जगताप यांच्या हस्ते घालण्यात आले.

दुपारी पालखीवर व पोपट महाराज (स्वामी) यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या वेळी ’दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा’चा जयघोष करण्यात आला. पालखी मंदिरात पोहोचल्यानंतर देवभेट व आशीर्वाद कार्यक्रम झाला. पोपट महाराज (स्वामी) यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर भक्तांसाठी मादुगिरी महाप्रसादाचे वाटप झाले. दत्त मंदिराभोवती आकर्षक रांगोळी, फुलांची सजावट, विद्युत रोषणाई केली होती. भजन, आरती व महाप्रसादाने सोहळा पार पडल्याची माहिती मंदिराचे व्यवस्थापक भरतनाना क्षीरसागर यांनी दिली. खासदार सुप्रिया सुळे, सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शा. बं. मुजुमदार, पुरंदरच्या गटविकास अधिकारी डॉ. अमिता पवार, बबन टकले, रामभाऊ बोरकर, प्रदीप बोरकर, चंद्रकांत बोरकर, एम. के. गायकवाड, दादा भुजबळ, श्रीनाथ बोरकर, मारुती बोरकर उपस्थित होते.

चोख पोलिस बंदोबस्त

पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विभागाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांच्यासह 10 सहायक पोलिस निरीक्षक, 80 पोलिस कर्मचारी, 20 होमगार्ड असा बंदोबस्त ठेवला होता.

हेही वाचा

Back to top button