Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो 2025 ला धावणार | पुढारी

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो 2025 ला धावणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पीएमआरडीएच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गावर मार्च 2025 मध्ये मेट्रो धावेल. तसेच, येत्या नऊ महिन्यांत या मार्गावरील सर्व मेट्रो स्टेशनची कामे पूर्ण केली जातील, अशी माहिती पीएमआरडीएच्या अधिकार्‍यांनी दिल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

हिंडवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या कामासह इतर विषयांवर नुकतीच महापालिका आणि पीएमआरडीएच्या अधिकार्‍यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीमध्ये गणेशखिंड रस्त्याच्या भूसंपादनावर चर्चा झाली. मात्र, येथील भूसंपादन व रस्ता रुंदीकरण प्रकरण न्यायालयात असल्याने त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. पीएमआरडीएच्या मेट्रो प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, मार्च 2025 मध्ये या मार्गावर मेट्रो धावेल, असा विश्वास पीएमआरडीएच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला.

तसेच येत्या नऊ महिन्यांत या मार्गावरील सर्व स्टेशनची कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य असून, मेट्रो स्टेशनच्या पार्किंगवर या वेळी चर्चा करण्यात आली. या अनुषंगाने महापालिकेने नियोजित मेट्रो स्टेशनच्या परिसरातील महापालिकेच्या आरक्षित जागांची यादी पीएमआरडीएला दिली. या यादीतील कोणती जागा पार्किंगसाठी फायदेशीर आहे, हे पीएमआरडीएने सांगितल्यानंतर ती त्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे विक्रम कुमार यांनी सांगितले.

मेट्रोच्या फेर्‍या वाढणार

प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन महामेट्रोने नवीन वर्षात पुणे मेट्रोच्या प्रवासी सेवेचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय आणि वनाझ ते रुबी हॉल या मार्गावरील फेर्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे.  त्यामुळे गर्दीच्या वेळेत दहा मिनिटांऐवजी 7.5 मिनिटांनी मेट्रो मिळणार आहे. यामुळे पुणेकरांना मेट्रोची वाट पाहत थांबावे लागणार नाही.

याआधी दिवसभरात मार्गिका 1 वर 81 फे-या होत होत्या, तर 1 जानेवारी 2024 पासून 113 फे-या होणार आहेत आणि मार्गिका 2 वर 80 फे-या होत होत्या, तर 1 जानेवारी 2024 पासून 111 फे-या होणार आहेत. गर्दीच्या वेळात मार्गिका 1 व 2 वर 6 मेट्रो ट्रेन कार्यान्वित आहेत, तर 1 जानेवारी 2024 पासून मार्गिका 1 व 2 वर 8 मेट्रो ट्रेन कार्यान्वित होणार आहेत. तसेच कमी गर्दीच्या वेळात मार्गिका 1 व 2 वर 4 मेट्रो ट्रेन सध्या कार्यान्वित आहेत. 1 जानेवारी 2024 पासून कमी गर्दीच्या वेळेत मार्गिका 1 व 2 वर 6 मेट्रो ट्रेन कार्यान्वित होणार आहेत.

हेही वाचा

Back to top button