

पारगाव : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात मागील 15 दिवसांपासून कडाक्याची थंडी पडत आहे. या बोचर्या थंडीने नागरिक बेजार झाले आहेत. या परिसरात मेंढपाळ, ऊसतोड कामगारांची कुटुंबे या थंडीमुळे त्रस्त झाली आहेत. तालुक्याच्या पूर्व भागात दरवर्षी दिवाळीच्या सणानंतर चार्याच्या शोधात नगर जिल्ह्यातील मेंढपाळांचे वाडे दाखल होतात. तसेच साखर कारखान्यांचादेखील गाळपाचा हंगाम सुरू होत असल्याने बीड, पाथर्डी, चाळीसगाव परिसरातील ऊसतोड कामगारांची कुटुंबेसुद्धा या परिसरात मोठ्या प्रमाणावर दाखल होतात. पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना परिसरातील अनेक गावांमध्ये ऊसतोड कामगारांनी माळरानावर झोपड्या उभारल्या आहेत. तसेच थोरांदळे, नागापूर, रांजणी, वळती, शिंगवे, पारगाव या परिसरातदेखील अनेक मेंढपाळांची कुटुंबे वास्तव्यास आहेत.
गेल्या पंधरा दिवसांपासून या परिसरात कडाक्याची थंडी पडत आहे. सायंकाळी सहानंतर नागरिक घरात थांबणे पसंत करतात. या थंडीने ऊसतोड कामगार व मेंढपाळांची कुटुंबे अक्षरश: बेजार झाली आहेत. त्यांच्या चिमुकल्यांचे मोठे हाल सुरू आहेत. हा संपूर्ण भाग घोड व मीना या नद्यांच्या किनारी वसलेला असल्यामुळे तुलनेने या परिसरात थंडीचे प्रमाण अधिकच असते. ही कुटुंबे उघड्यावरच असल्याने कडाक्याच्या थंडीचा त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.