गुंड तिरुपती ऊर्फ टक्या लष्कर टोळीवर मोक्का | पुढारी

गुंड तिरुपती ऊर्फ टक्या लष्कर टोळीवर मोक्का

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  गुंड तिरुपती ऊर्फ टक्या लष्कर आणि इतर तीन साथीदारांवर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यानुसार कारवाई केली आहे. टोळीप्रमुख तिरुपती ऊर्फ टक्या विठ्ठल लष्कर (21, रा. पापड वस्ती, पुणे), शुभम सुरेश करांडे (22, रा. हडपसर, पुणे), अथर्व रवींद्र शिंदे (21 रा. साडेसतरा नळी, हडपसर) यांच्यासह एका अनोळखी व्यक्ती अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर शुभम करांडे याला अटक करण्यात आली आहे. टक्या आणि शुभम करांडे यांनी 2021 मध्ये पापडे वस्ती येथे एकाचा खून केला होता. त्यामध्ये फिर्यादीने पोलिसांना मदत केल्याचे समजून आरोपींनी फिर्यादींच्या हॉटेलमधील साहित्याची तोडफोड करून धारदार शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न केला होता. याबाबत हडपसर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

टक्याने आपल्या साथीदारांना एकत्र करून संघटित गुन्हेगारी परिसरात सुरू केल्याचे तपास समोर आले. टोळीचे वर्चस्व आणि दहशत परिसरात राहवी म्हणून त्याने गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याच्यावर यापूर्वीदेखील प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असताना, त्याने पुन्हा-पुन्हा गंभीर गुन्हे केले आहेत. त्यामुळे दाखल गुन्ह्यात मोक्काचा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी परिमंडळ 5 चे पोलिस उपायुक्त आर. राजा यांच्यामार्फत पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांना सादर केला होता.

या अर्जाची छाननी करून अपर पोलिस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. या प्रकरणाचा पुढील तपास हडपसर विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त अश्विनी राख करीत आहेत. ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलिस उपायुक्त आर. राजा, सहायक पोलिस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संदीप शिवले, सहायक निरीक्षक सारिका जगताप, उप निरीक्षक सुशील डमरे यांनी केली.

Back to top button