

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी येथील नेहरूनगर मधील विठ्ठलनगर पुनर्वसन वसाहतीमध्ये एका घराला आग लागली. आगीच्या ज्वाळांनी सातव्या मजल्या पर्यंत पेट घेतला. सदर घटना रविवारी (दि. 24) रोजी मध्यरात्री घडली. यामध्ये 20 ते 25 वाहनांचे नुकसान झाले आहे. तसेच घरातील साहित्य जळून खाक झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठलनगर वसाहतीत एकूण बारा इमारती आहेत. यातील पाचव्या इमारतीमधील एका घराला रविवारी मध्यरात्री आग लागली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. काही वेळेत आगीने रौद्ररूप धारण केले.
परिसरातील नागरिकांनी अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन केंद्राचा बंब घटनास्थळी दाखल झाला. जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. घराच्या आजूबाजूला पार्क केलेली 20 ते 25 वाहने जळून खाक झाली. जखमींबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.