तापमान वाढ रोखण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा : चंद्रकांत इंदलकर | पुढारी

तापमान वाढ रोखण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा : चंद्रकांत इंदलकर

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरातील तापमानात वाढ निर्माण होत आहे. त्या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी नागरी सहभाग महत्त्वाचा आहे. त्यासाठी महापालिका शहराचा हीट अ‍ॅक्शन प्लॅन तयार करीत आहे. तो प्लॅन उपयुक्त ठरणार आहे, असे महापालिकेचे सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी शुक्रवारी (दि. 22) सांगितले. महापालिका व डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर यांच्या वतीने महापालिका भवनात ‘हीट अ‍ॅक्शन प्लॅन’ या विषयावर कार्यशाळा झाली. त्यात ते बोलत होते.

या वेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सहशहर अभियंता डॉ. ज्ञानदेव जुंधारे, संजय कुलकर्णी, उपायुक्त मनोज लोणकर, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता हरविंदरसिंग बंसल, कॉलेजचे डॉ. प्राजक्ता कुलकर्णी, अश्विनी केसकर, विश्वास दीक्षित, व्रिंदा दीक्षित, गणेश शिंदे, निलेश करकरे, विद्या कुंभार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उष्णतेमुळे होणार्‍या मृत्यूंच्या प्रमाणात वाढ

प्राजक्ता कुलकर्णी म्हणाल्या, की उष्णतेमुळे होणार्‍या मृत्यूंचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हाळ्यामुळे उद्भवणार्‍या समस्यांमध्ये प्रामुख्याने अतिसारासारखे पचनक्रियेशी संबंधित आजार व उष्माघात या आजारांचा समावेश असतो. त्वचेसंदर्भात समस्या उद्भवू शकतात. रात्रीच्या वेळी अनेक शहरांचे तापमान जास्त असते. त्यामध्ये भारतातील 44 शहरांचा समावेश आहे.

शहरातील विविध भागांमध्ये झाडांचे प्रमाण जास्त असले तरी रात्रीच्या वेळी तापमान कमी होण्यास अधिक वेळ लागत असल्याचे अभ्यासात समोर आले आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेचा प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी प्रशासकीय व शहरी नियोजन करणे गरजेचे आहे. सार्वजनिक पायाभूत सुविधा, जनजागृती, क्षमता निर्माण व तापमानाचा सर्वात जास्त परिणाम होणारे समुदाय ओळखून योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.

उष्णतेचा सामना करण्यासाठी महापालिका हे करणार

शहरातील तापमान आटोक्यात आणण्यासाठी किंवा तापमानाच्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येणार आहे. कार्यशाळेत त्यावर चर्चा झाली. यामध्ये उड्डाण पुलांच्या खाली विसावा घेण्यासाठी जागा निर्माण करणे, रहदारीच्या ठिकाणी पाण्याची फवारणी करणे, शहरातील उद्यानांच्या वेळेत बदल करणे, दुपारी 12 ते 3 दरम्यान काही भागातील वाहतूक सिग्नल बंद करणे. बांधकामांच्या ठिकाणी किंवा घराबाहेर काम करणार्या कामगारांच्या वेळेत बदल करणे. पोलिस ठाणे, दवाखाने, रुग्णालयांमध्ये उष्णता आपत्कालीन प्रतिसाद पथके स्थापन करणे आदींचा समावेश आहे.

हेही वाचा

Back to top button