शिरूरच्या पूर्वभागात धोकादायकरीत्या ऊस वाहतूक | पुढारी

शिरूरच्या पूर्वभागात धोकादायकरीत्या ऊस वाहतूक

मांडवगण फराटा : पुढारी वृत्तसेवा :  शिरूर तालुक्यातील ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरला तीन ते चार ट्रेलर जोडून ऊस वाहतूक करण्यात येत आहे. उसाने भरलेला ट्रेलर व त्यावर कामगारदेखील बसवले जातात व धोकादायक पद्धतीने प्रवास ऊस टेलरच्या माध्यमातून कामगार करतात. परिणामी या परिसरामध्ये अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या रस्त्यांवरून उसाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. या वाहतूक करणार्‍या वाहनांना रिफ्लेक्टर लावलेले नसल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे, याकडे पोलिस व प्रादेशिक परिवहन विभाग दुर्लक्ष करीत आहे. तसेच ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टरचालक आपल्याच धुंदीत वाहन चालवत असल्याने प्रवास करणे धोकादायक झाले आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला जिल्हा परिषद प्राथमिक, उच्च माध्यमिक महाविद्यालय, अंगणवाडी आहेत. या ठिकाणावरून देखील जोरदार ट्रॅक्टर नेला जातो. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनादेखील धोका पोहोचण्याची शक्यता आहे.

ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टरचालक हे विनापरवाना वाहन चालवत असून त्यांची तपासणी होण्याची गरज आहे. अपुरे रस्ते, साईडपट्ट्यांचा अभाव, काही ठिकाणी रस्त्याची सुरू असलेली कामे तसेच जलजीवन योजनेसाठी खोदलेले रस्ते, तीव्र चढाचा भाग यामुळे ट्रॅक्टर, ट्रक यातून ऊस वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. काही वेळा हा प्रवास जिवावर बेतत असल्याचे बोलले जात आहे.

गाणीदेखील अपघातास कारण
काही ट्रॅक्टरचालक ऊस वाहतूक करत असताना ट्रॅक्टरमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावून उसाची वाहतूक करत असतात. त्यामुळे पाठीमागून पुढे येण्याच्या प्रयत्नात असणार्‍या वाहनाने कितीही मोठ्या प्रमाणात हॉर्न दिला तरीही हे गाणी लावलेले ट्रॅक्टरचालक वाहनाला जागा देत नाहीत.

Back to top button