

मंचर : पुढारी वृत्तसेवा : कृषी पंपाद्वारे शेती पिकांना पाणी देणार्या शेतकर्यांना जलसंपदा विभागाच्या वतीने दहापट वाढीव दराबाबत सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोध दर्शवला आहे. ही वाढीव दरवाढ रद्द करण्याबाबत त्यांनी पाठपुरावा केला असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणीपट्टी प्रश्नाबाबत तत्काळ तपासणी करून कार्यवाही करण्याचे आदेश राज्य जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर यांना दिले आहेत. आंबेगाव, जुन्नर, शिरूर व पारनेर तालुक्यांत कुकडी प्रकल्पांतर्गत घोड, मीना, कुकडी कालवे या कार्यक्षेत्रात कृषी पंपाद्वारे लाभधारक शेतकरी पाणी वापर करतात.
संबंधित बातम्या :
त्यांना पिकानुसार हेक्टरी सरासरी 1 हजार 500 रुपये वार्षिक पाणीपट्टी आकारली जात होती. मात्र, यावर्षी हेक्टरी 12 हजार रुपये वार्षिक पाणीपट्टी आकारली आहे. पाणीपट्टी रक्कम पाहून शेतकरीवर्गात खळबळ उडाली होती. याबाबत मंचर येथे मंत्री दिलीप वळसे पाटील यांना गेल्या आठवड्यात शेतकर्यांचे शिष्टमंडळ भेटले होते. दरम्यान, नागपूर येथील हिवाळी विधिमंडळात मंगळवारी (दि. 19) वळसे पाटील यांनी फडणवीस यांना पत्र देऊन शेतकर्यांना न्याय देण्याची मागणी केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणीपट्टी प्रश्नाबाबत तत्काळ तपासणी करून कार्यवाही करण्याचे आदेश राज्य जलसंपदा विभागास दिले आहेत.
पाणीपट्टीच्या दरामध्ये झालेली वाढ फारच जास्त असल्याने वाढीव दराने पाणीपट्टी भरणे शेतकऱ्यांना अडचणीचे आहे. यामुळे त्यांचे आर्थिक गणित बिघडेल. शेतकरी वाढीव पाणीपट्टी भरण्यास अनुत्सुक आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या रोषात वाढ होईल. याबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, असा मला विश्वास आहे.
– दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री, महाराष्ट्र राज्य.