जलजीवन योजनांची होणार चौकशी : मंत्री गुलाबराव पाटील यांचे आदेश | पुढारी

जलजीवन योजनांची होणार चौकशी : मंत्री गुलाबराव पाटील यांचे आदेश

वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा : मावळ तालुक्यात जलजीवन मिशन योजनेंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांचे झालेले निकृष्ट दर्जाचे काम व त्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत आमदार सुनील शेळके यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडल्यानंतर पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील व आमदार शेळके यांच्या अधिवेशनातच खडाजंगी झाली होती. दरम्यान, मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज संबंधित योजनांची चौकशी करून कार्यवाही करण्याची सूचना प्रधान सचिवांना केली आहे.

आमदार शेळके यांनी आज (दि.20 रोजी) मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन लेखी पत्राद्वारे पाणी योजनांची सद्यस्थिती दिली आहे. त्यामुळे मावळ तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांची चौकशी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यामध्ये सामील असलेल्या अधिकारी व ठेकेदार यांचे धाबे दणाणले आहेत. मावळ तालुक्यात नद्या, धरणे असूनदेखील पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत होते. आमदार शेळके यांनी महिला-भगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरावा यासाठी पाठपुरावा करून 114 पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणल्या, परंतु त्यातील अनेक योजनांचे काम निकृष्ट झाल्याचे स्पष्ट दिसत असून, अनेक योजनांची मुदतदेखील संपली आहे. या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याने आमदार शेळके आक्रमक झाले असून दोषींवर कडक कारवाई व्हावी, यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत आहेत.

या योजनांच्या होणार चौकशी..

सावळा, खांडशी, कोंडीवडे आ.मा., घोणशेत, वडेश्वर, माऊ, केवरे चावसर, शिरदे, वळक, कुसवली, नागाथली, कुसगावं प.मा., थुगाव, येलघोल, कुरवंडे, गहंजे, करंजगाव, जाधववाडी, मिंडेवाडी, बथलवाडी, नवलाख उंबरे, धामणे, चिखलसे.

प्रत्यक्ष कारवाई कधी होणार ?

तालुक्यातील 114 पैकी फक्त 27 योजनांचे काम पूर्ण झाले असून सुमारे 87 योजनांचे काम मुदत संपूनही अत्यंत धिम्या गतीने सुरू असून, काही ठिकाणी तर काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाणी मिळणार कधी? हा सवाल उपस्थित होत आहे. यावर अधिकारी आणि ठेकेदार कुठल्याही प्रकारची जबाबदारी न घेता टोलवाटोलवी करीत असल्याचे दिसून येत आहे. आमदार शेळके यांनी याबाबत 11 डिसेंबर रोजी मुद्दा उपस्थित करून थर्ड पार्टी ऑडिटची मागणी केली होती व त्यानंतर लक्षवेधी उपस्थित करून यावर प्रत्यक्ष कारवाई कधी होणार, याबाबत जाब विचारला होता.

हेही वाचा

Back to top button