अखेर.. मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघ बरखास्त | पुढारी

अखेर.. मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघ बरखास्त

गणेश विनोदे

वडगाव मावळ : मावळ तालुक्याच्या सहकार क्षेत्रात गेली 51 वर्षे कार्यरत असलेल्या मावळ तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघातील 4 संचालक अपात्र व 2 संचालकांनी राजीनामा दिल्याने मासिक सभा व तहकूब सभा अशा दोन्ही सभा कोरमअभावी रद्द झाल्याने अखेर हा संघ सहाय्यक निबंधक सर्जेराव कांदळकर यांनी बरखास्त करून प्रशासकीय कामकाजासाठी प्राधिकृत अधिकार्‍यांची नेमणूक केली आहे.

त्यामुळे वर्षभर खेळ चालूनही मेळ न बसल्याने अखेर हा संघ वर्षभरातच बरखास्त झाला आहे. दरम्यान सत्तेचे राजकारण व काही संचालकांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे अल्पावधीतच संचालकांमधील मतभेदाला सुरुवात झाली. चार संचालकांनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या. यामध्ये संबंधित चारही संचालकांवर अपात्रतेची कारवाई झाली. तर तब्बल 25 ते 30 वर्षे सलग संचालक म्हणून
कार्यरत असलेल्या अंकुश आंबेकर व सोपानराव कदम या दोन संचालकांनी गेल्या महिनाभरात राजीनामे दिले.

त्यामुळे, दि .30 नोव्हेंबर व 7 डिसेंबर रोजी झालेली संस्थेची मासिक सभा व तहकूब सभा अशा दोन्ही सभा कोरमअभावी रद्द झाला. याबाबतचा अहवाल सचिव धनंजय बर्गे यांनी सहाय्यक निबंधक कांदळकर यांच्याकडे पाठविल्यानंतर त्यांनी संबंधितांना नोटिसा पाठवून सुनावणी घेतली व बुधवार (दि. 20) संघ बरखास्त करून प्रशासकीय अधिकार्‍यांची नेमणूकही केली.

वर्षभर चालला खेळ, तरीही नाही बसला मेळ !

  •  सन 1972 साली मावळ तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाची स्थापना झाली असून वडगाव मावळ येथे मावळ पंचायत समितीच्या आवारात संस्थेचे स्वत:चे कार्यालय आहे. संबंधित कार्यालयाचे नूतनीकरण गतवर्षी झालेल्या
    निवडणुकीपूर्वीच मागील पंचवार्षिक कालावधीतील काही ज्येष्ठ संचालकांच्या पुढाकाराने करण्यात आले असल्याने संस्थेचे सुसज्ज कार्यालयही आहे. याशिवाय तब्बल 51 लाखांच्या ठेवी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत आहेत.
  •  अशा सुस्थितीत असलेल्या खादी ग्रामोद्योग संघाची निवडणूक गतवर्षी झाली. यामध्ये अंकुश आंबेकर, गणेश भांगरे, सुदेश गिरमे, चंद्रकांत दहिभाते, सोपानराव कदम, कल्पना कांबळे, कांचन भालेराव, अमित ओव्हाळ, सूरज बुटाला व उमाजी भांडे हे 10 संचालक विजयी झाले, तर एक जागा रिक्त राहिली. त्यानंतर सत्तेच्या राजकारणाला सुरुवात झाली. यामध्ये चेअरमनपदी कांचन भालेराव तर, व्हाईस चेअरमनपदी अमित ओव्हाळ यांची निवड झाली.

‘पुढारी’ चे वृत्त ठरले खरे !

संस्थेतील दहा संचालकांपैकी चार संचालक अपात्र ठरले व त्यानंतर दोन संचालकांनी राजीनामे दिले व कोरमअभावी सभा झाली नाही. त्यामुळे संस्था बरखास्त होण्याच्या मार्गावर असल्याबाबत ‘पुढारी’ने (दि. 8 डिसेंबर) रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते ते वृत्त सहाय्यक निबंधक कांदळकर यांनी दिलेल्या आदेशामुळे खरे ठरले आहे.

सहा महिन्यांसाठी प्रशासकाची नियुक्ती !

दरम्यान, संघाचे प्रशासकीय कामकाज पाहण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून बी. जे. पवार यांची नेमणूक करण्यात आली असून, पुढील सहा महिने ते संस्थेचे प्रशासक म्हणून कामकाज पाहणार आहेत व संस्थेची निवडणूक लावून पुढील संचालक मंडळाच्या ताब्यात कारभार देणार आहेत.

हेही वाचा

Back to top button