Pimpri Crime News : कोट्यवधींचा ऐवज मिळाला परत

Pimpri Crime News : कोट्यवधींचा ऐवज मिळाला परत

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी किचकट गुन्ह्यांची उकल करत चोरीला गेलेला 2 कोटी 42 लाख 59 हजार रुपयांचा ऐवज तक्रारदारांना माघारी दिला. ऐवज परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले. या वेळी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सहआयुक्त संजय शिंदे, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे, डॉ. विवेक पाटील, स्वप्ना गोरे यांच्यासह सर्व सहायक आयुक्त, वरिष्ठ निरीक्षक आणि तक्रारदार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील 125 गुन्ह्यांतील एकूण 484 ग्रॅम वजनाचे 21 लाख 37 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, चारचाकी 2 वाहने, 22 मोटारसायकल, 69 मोबाईल, विविध कंपन्यांतून चोरीला गेलेला मुद्देमाल, 3 लॅपटॉप असे एकूण एक कोटी 23 लाख 18 हजार तसेच सायबर गुन्ह्यांंसह गुन्ह्यांमधून जप्त केलेली रोख रक्कम 48 लाख 94 हजार, असा एकूण 2 कोटी 42 लाख 59 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत केला. पोलिस आयुक्त चौबे म्हणाले, हरवलेल्या वस्तू परत मिळाल्याने त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून पोलिस अधिकारी म्हणून आम्हाला आमच्या कामाची पावती मिळाली आहे.

पोलिसांना पर्याय नाही

सरकारी विभाग किंवा खासगी, कॉर्पोरेट विभागात वेगवेगळ्या सेवा दिल्या जातात. या सेवांचा दर्जा चांगला असणे गरजेचे असते. खासगी संस्था, हॉटेल यांच्याकडून चांगल्या सेवा न मिळाल्यास नागरिकांना दुसरा पर्याय उपलब्ध असतो. मात्र, पोलिस, अग्निशामक दल यासारख्या विभागात दुसरा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे सेवांचा दर्जा नेहमीच न चुकता चांगलाच ठेवावा लागतो. त्यामध्ये कोणतीही तडजोड होऊ नये, ही वरिष्ठ अधिकार्‍यांची जबाबदारी असते, असे मतही विनयकुमार चौबे यांनी व्यक्त केले.

…असे कार्यक्रम नेहमी होतील

चोरीला गेलेला ऐवज माघारी मिळाल्यानंतर तक्रारदारांना चेहर्‍यावरचा आनंद लपवता आला नाही. याबाबत बोलताना सहआयुक्त डॉ. संजय शिंदे म्हणाले की, नागरिकांच्या चेहर्‍यावरील आनंद हीच आमच्या कामाची पावती आहे. आगामी काळातही अशा प्रकारचे कार्यक्रम नेहमी होतील. सर्वसामान्यांच्या सेवेसाठी पोलिस कटिबद्ध आहेत.

 हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news