विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन खात्याने दिले जीवदान | पुढारी

विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन खात्याने दिले जीवदान

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : भक्ष्य शोधण्याच्या नादात हिवरे तर्फे नारायणगाव(ता.जुन्नर) येथील देवजाळी मळ्यातील बाळासाहेब मुळे यांच्या विहिरीत पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बिबट्या पडला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे वन क्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांनी घटनास्थळी रेस्क्यू टीम पाठवून बिबट्याला बाहेर काढले व माणिकडोह येथील निवारा केंद्रात हालविले. विहिरीतून बाहेर काढलेला बिबट्या मादी असून तिचे वय सहा वर्षाचे आहे. या बाबत समजलेली माहिती अशी की, देवजाळी येथील बाळासाहेब मुळे यांच्या विहिरीत पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बिबट्या पडल्याचे विहिरीजवळ राहत असलेल्या लोकांच्या लक्षात आले.

विजेचा पंप चालू करण्यासाठी मजूर गेले असता त्यांना विहिरीत गुरकवण्याचा आवाज आल्याने त्यांनी मोबाईलच्या उजेडात विहिरीत डोकावले असता विहिरीत बिबट्या दिसला. त्यांनी ही माहिती बाळासाहेब मुळे यांना दिल्यावर मुळे यांनी फोन करून माहिती वन विभागाला कळविली. वन खात्याचे पथक तात्काळ घटनास्थळी आले व त्यांनी बिबट्याला बाहेर काढून माणिकडोह निवारा केंद्रात हलविले आहे. बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू पथकला वनपाल अनिता होले, वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, नितीन विधाटे, वारुळवाडी गावचे पोलीस पाटील सुशांत भुजबळ,आदित्य डेरे, रामकृष्ण चोपडा, बॉबी ढवळे, दयानंद मुळे, तुषार टेके, शंतनू डेरे, मांजरवाडी गावचे पोलीस पाटील सचिन किसनराव टावरे यांनी मदत केली.

दरम्यान देवजाळी परिसरात 3/4 बिबटे असून या बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी बाळासाहेब मुळे यांनी केली आहे. ते म्हणाले या विहिरीजवळ मजूर कुटुंब राहत असून त्यांच्याजवळ कोंबड्या व पाळीव कत्रे आहे. शिकारीच्या आशेने बिबट्या दररोज येत असून या कुटूंबात लहान मुले आहेत. बिबट्या या लहान मुलांवर हल्ला करून काही धोका होण्याची भीती निर्माण झाली आहे.

थेट खासदारांना फोन
आपल्या शेताजवळ दररोज बिबट्या येत असल्यामुळे बाळासाहेब मुळे यांनी थेट खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना फोन करून त्यांना बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.एक तर पकडलेले बिबटे ताडोबा जंगलात सोडा नाहीतर त्यांची नसबंदी करा अशी मागणी केली.

कुत्र्यावर हल्ला
पकडलेला बिबट्या कोंबड्यांची शिकार करण्याच्या आशेने आला असावा. विहिरीजवळ मजुराच्या कोंबड्यांचे खुराडे आहे. त्यात कोंबड्या आहेत. बिबटयाने खुराडे उचकटण्याचा प्रयत्न केला. आवाजाने मजुरांचा “मोत्या” कुत्रा भुंकला बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करून त्यांच्या तोंडावर दोन जखमा केल्या त्या झटापटीत लागतच्या विहिरीत बिबट्या पडला. मात्र मोत्या कुत्रा बिबट्याला हल्ल्यात जखमी झाला परंतु वाचला.

Back to top button