…अन्यथा 25 डिसेंबरपासून ऊसतोड बंद | पुढारी

...अन्यथा 25 डिसेंबरपासून ऊसतोड बंद

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  ऊसतोडणी व वाहतुकीच्या दरात वाढ न झाल्यास 25 डिसेंबरपासून ऊसतोडणी, वाहतूक बंद केली जाईल, असा इशारा ऊसतोड व वाहतूक संघटनांनी दिला आहे. ऊसतोडणी वाहतूकदार-मुकादम यांचा ऊसतोडणी भाववाढीसाठी संप सुरू आहे. ऊसतोडणी संघटना व साखर संघ यांच्यात दर तीन वर्षांनी ऊसतोडणी व वाहतुकीचे दर ठरवले जातात. सन 2020-2023 या 3 वर्षे कराररची मुदत संपली आहे. नवीन करार करण्यासाठी साखर संघासोबत आतापर्यंत तीन बैठका पार पडल्या आहेत. पहिल्या बैठकीमध्ये 7 टक्के, दुसर्‍या बैठकीमध्ये 24 टक्के, तिसर्‍या बैठकीमध्ये 27 टक्के भाववाढ देण्याचा प्रस्ताव साखर संघाने ठेवला आहे.

मात्र ऊसतोडणी, वाहतूकदार, मुकादम यांच्या सर्व संघटना 50 टक्के भाववाढ झाली पाहिजे या मागणीवर ठाम आहेत. ऊसतोडणी मजुरांना 237 रुपयांवरून आता 273 रुपये एवढी टनाला तोडणी दिली जाते. यामध्ये खूप मोठी तफावत आहे, दुसर्‍या शेजारील राज्यात महाराष्ट्रापेक्षा ऊसतोडणी व वाहतुकीच्या दरात मोठी तफावत आहे. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील मजूर दुसर्‍या राज्यात ऊसतोडणी, वाहतुकीसाठी जात आहेत. त्याचा परिणाम राज्यातील साखर कारखान्यावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातील सगळे कारखाने मजुरांअभावी पाहिजे तेवढा ऊसपुरवठा करू शकत नाहीत.

राज्यातील 50 टक्के कारखाने 24 तासांपैकी 8-10 तास उसाअभावी बंद ठेवावे लागत आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्रातील सगळ्यात मोठा असलेला साखर उद्योग अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऊसतोडणी, वाहतूकदार, मुकादम संघटना यांच्यात जो संप चालू त्यासाठी लवाद आहे. या लवादामध्ये पूर्वी ऊसतोडणीच्या बाजूने स्वर्गीय गोपीनाथ मुंडे व साखर संघाच्या बाजूने ज्येष्ठ नेते शरद पवार बाजू मांडत होते. आता पंकजा मुंडे व जयंत पाटील हे लवादामध्ये आहेत. 27 टक्क्यांवरून 50 टक्के वाढ न केल्यास ऊस संघटनांनी 25 डिसेंबरपासून ‘कोयता बंद’ ची हाक दिली आहे.

हेही वाचा :

Back to top button