Pune News : ‘त्या’ जलतरण तलावाचा अहवाल ‘गुलदस्त्यात’ | पुढारी

Pune News : ‘त्या’ जलतरण तलावाचा अहवाल ‘गुलदस्त्यात’

सुनील जगताप

पुणे : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या विभागीय क्रीडा संकुल येथील जलतरण तलाव चालविण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेमध्ये 45 लाख रुपये देखभाल दुरुस्तीसह रक्कम असताना ती केवळ 28 लाख 10 हजार रुपयांमध्ये एका खासगी संस्थेला देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचा चौकशी अहवाल अद्यापही गुलदस्त्यात असून अधिकार्‍यांकडून वेळकाढूपणा सुरू असल्याचे दिसून येत आहे.

येरवडा येथील विभागीय क्रीडा संकुल येथे क्रीडा विभागाचा जलतरण तलाव चालविण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यामध्ये सुरुवातीला दोन जणांचे टेंडर आले होते. परंतु, त्यामधील एक रद्द झाल्याने पुन्हा प्रक्रिया नव्याने करण्यात आली. या प्रकियेमध्ये 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2019 साठी 45 लाख रुपयांची रक्कम असताना केवळ 28 लाख 10 हजार रुपयांना अंतिम करण्यात आली आहे. याचमप्राणे 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2020 साठी 49 लाख 50 हजार असताना 28 लाख 70 हजार रुपयांना, 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2021 साठी 54 लाख 45 हजार असताना 29 लाख 20 हजार रुपयांना, 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2022 साठी 59 लाख 89 हजार 500 रुपयांना असताना 29 लाख 50 हजार रुपयांना तर 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2023 साठी 65 लाख 88 हजार 450 असताना 30 लाख 40 हजार रुपयांना अंतिम करण्यात आली आहे.

या ई-निविदेतील रकमेनुसार एकूण तफावत तब्बल 1 कोटी 28 लाख 82 हजार 950 रुपयांची दिसून येत असून, शासनाचा महसूल बुडविल्याचे समोर दिसत आहे. या प्रकरणाची क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने दखल घेऊन चौकशी समिती नेमण्यात आली आहे. चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल 9 ऑगस्ट रोजी आयुक्त कार्यालयाला सादर करण्यात आला. मात्र, या अहवालामध्ये काही त्रुटी असल्याने तो पुन्हा विभागीय उपसंचालकांकडे पाठविण्यात आला. गेल्या चार महिन्यांमध्ये अद्यापही हा अहवाल पूर्ण झालेला नसल्याने सर्व प्रकरण ’गुलदस्त्यात’च असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणात शासनाची झालेली दिशाभूल तसेच आर्थिक नुकसान भरून मिळणार का याकडे क्रीडापटूंचे लक्ष लागले आहे.

अहवाल दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. त्यामध्ये असलेल्या त्रुटीबाबत संबंधित तलाव चालकाला काही प्रश्नांची माहिती मागितली आहे. ती माहिती मिळताच अहवालाचे काम पूर्ण होऊन लवकरच तो क्रीडा संचालनालयामध्ये सादर केला जाईल.

– अनिल चोरमले, उपसंचालक, विभागीय क्रीडा कार्यालय

येरवडा येथील विभागीय क्रीडा संकुलातील जलतरण तलावातील आर्थिक व्यवहार प्रकरणातील प्राथमिक चौकशी अहवाल ऑगस्टमध्येच मिळाला होता. परंतु, त्यामध्ये काही विषयांचा उलगडा होत नसल्याने त्रुटीसह दुरुस्त करून पाठवा, असा रिमार्क देऊन पुन्हा पाठविण्यात आला होता. परंतु, अद्यापही दुरुस्तीसह अहवाल प्राप्त झालेला नाही.

– सुधीर मोरे, सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय

हेही वाचा

Back to top button