

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : पानशेत धरण खोर्यातील ठाणगाव (ता. वेल्हे) येथील हिरवे धनगर वस्तीत स्वातंत्र्यानंतर प्रथमच वीज पोहचणार आहे तसेच शिरकोली (ता. वेल्हे) येथील स्मशानभूमीसह पासलकर वस्तीतदेखील वीजपुरवठा करण्यात येणार आहे. आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हिरवे धनगरवस्तीच्या विद्युतीकरणासाठी साडेसहा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हिरवेवस्ती तसेच शिरकोली स्मशानभूमी व पासलकर वसतीला वीजपुरवठा करण्यासाठी शिरकोलीचे सरपंच अमोल पडवळ व स्थानिक कार्यकर्ते संजय हिरवे हे अनेक महिन्यांपासून पाठपुरावा करत आहेत. हिरवे वस्तीत आठ कुटुंबे आहेत.
महावितरणचे मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता माणिक राठोड यांनी पानशेतच्या दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांच्या विद्युतीकरणाबाबत नियोजनबद्ध आराखडा तयार केला आहे. याबाबत महावितरण वेल्हे विभागाचे तांत्रिक अधिकारी लोकेश नेहते म्हणाले, ठाणगाव हिरवेवस्ती व शिरकोली स्मशानभूमीच्या विद्युतीकरणासाठी आर्थिक मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी वीजपुरवठ्याची कामे लवकर सुरू होतील.
स्वातंत्र्यानंतरही डोंगरमाथ्यावरील वाड्या-वस्त्यांवर वीज पोहचली नाही. रायगड जिल्ह्यालगतच्या सह्याद्रीच्या डोंगररांगात हिंस्र प्राण्यांचा वावर आहे. हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात नागरिक जखमी झाले आहेत. दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांच्या विद्युतीकरणासाठी शासनाने आवश्यक निधी उपलब्ध करावा.
– अमोल पडवळ, सरपंच, शिरकोली.