वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील चित्र : स्वच्छतागृहांची लागली वाट! | पुढारी

वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील चित्र : स्वच्छतागृहांची लागली वाट!

वडगाव शेरी : नगररोड वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात लोकसंख्येच्या तुलनेत स्वच्छतागृहांची संख्या कमी आहे. वडगाव शेरी येथील भाजी मंडई, राजे छत्रपती श्रीशिवाजी महाराज उद्यान, कल्याणीनगर जॉगर्स पार्क उद्यान आणि विमाननगर सीसीडी चौक येथील स्वच्छतागृहांची वेळेवर स्वच्छता केली जात नाही. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिक त्रस्त झाले आहेत.
क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत बहुतांश स्वच्छतागृह अस्वच्छ असल्याचे चित्र दिसून येत आहे.

वडगाव शेरी येथील राजे छत्रपती श्रीशिवाजी महाराज उद्यानालगत असलेल्या स्वच्छतागृहात दुर्गंधी पसरली आहे. या स्वच्छतागृहात पाणी नसून बेसिनही तुटले आहेत. स्वच्छतागृहातील भांड्यांचीही दुरवस्था झाली असून, त्यात कचरा साचला आहे. या स्वच्छतागृहांमध्ये विजेचाही अभाव आहे. कल्याणीनगर येथील उद्यानातील स्वच्छतागृह गेल्या काही दिवसांपासून स्वच्छ केले नाही. त्यामुळे त्या ठिकाणी पाणी साचत आहे. विमाननगर येथील सीसीडी चौकातील स्वच्छतागृह वेळोवळी साफ केले जात आहे. परंतु या स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीअभावी दुरवस्था झाली असून, परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणे अवघड होत आहे. इतर स्वच्छता गृहांची अवस्था दयनीय झाली आहे.

या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात स्वच्छतागृहांची संख्या खूप कमी आहे. जे स्वच्छतागृह आहेत. त्यांची स्वच्छता वेळेवर केली जात नाही. त्यामुळे नागरिकांना स्वच्छतागृहांचा वापर करता येत नाही. महापालिकेने स्वच्छतागृहांची वेळेवर स्वच्छता करणे गरजेचे आहे.

– उध्दव गलांडे, शहर उपसंघटक, शिवसेना.

या भागातील स्वच्छतागृह साफ करण्यासाठी एकच गाडी आहे. त्यामुळे सर्व स्वच्छतागृह स्वच्छता करण्यासाठी वेळ लागतो. त्यातील तुटलेले बेसिन, वीज व पाण्याचा अभाव तसेच देखभाल, दुुरुस्तीबाबत वरिष्ठांना कळवले आहे.

-संदेश रोडे, आरोग्य निरीक्षक, नगररोड-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय.

हेही वाचा

Back to top button