
कात्रज : पुढारी वृत्तसेवा : कात्रज ते नवले पूल या बाह्यवळण महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू असून, बेलदरे पंपसमोरील नव्या भुयारी मार्गाचे काम 50 टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम येत्या फेब—ुवारीअखेर पूर्ण होणार आहे. दत्तनगर येथील राजमाता भुयारी मार्गाचे काम पंधरा दिवसांत सुरू होईल. तसेच मे अखेरपर्यंत रुंदीकरणाचे काम पूर्ण होणे अपेक्षित असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आली.
बाह्यवळण महामार्गावरील सुरू असलेले भुयारी मार्गाचे काम व वाहतूक नियोजनबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण शाखा अभियंता अतुल सुर्वे, माजी नगरसेवक युवराज बेलदरे, भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कणसे यांनी पाहणी केली. कात्रज देहूरोड बाह्यवळण महामार्गावरील कात्रज ते नवलेपूल या साडेतीन किलोमीटर अंतराचे सहा पदरी रुंदीकरण काम प्रधिकरणाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे.
कणसे म्हणाले, 'दत्तनगर-जांभूळवाडी रस्त्यावर वाहतूक अधिक असल्याने राजमाता भुयारी मार्गाचे काम करण्यासाठी वाहतुकीत बदल करावा लागेल. त्या दृष्टीने नियोजनासाठी संबंधित अधिकारी बैठक घेऊन अंतिम नियोजन केले जाणार आहे.' दत्तनगर येथील राजमाता भुयारी मार्गावर येणारा वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी बेलदरे पंप येथे अतिरिक्त भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम निम्मे पूर्ण झाले आहे तसेच अरुंद व कमी उंचीच्या दत्तनगर राजमाता भुयारी मार्गात नित्याची होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नव्याने 18 मीटर रुंद व 5 मीटर उंच भुयारी मार्ग बांधण्यात येणार असल्याचे बेलदरे यांनी सांगितले.
हेही वाचा