घाण करणार्‍यांच्या विरोधात महापालिकेची मोहीम; 72 लाखांचा दंड वसूल | पुढारी

घाण करणार्‍यांच्या विरोधात महापालिकेची मोहीम; 72 लाखांचा दंड वसूल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक ठिकाणी घाण करणार्‍यांविरोधात महापालिकेने कारवाई मोहीम तीव्र केली असून, गेल्या अडीच महिन्यांत 18 हजार 258 जणांकडून तब्बल 72 लाख 43 हजार 148 रुपये दंड वसूल केला आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, लघुशंका करणे, थुंकणे, कचर्‍याचे वर्गीकरण न करणे, कचरा जाळणे, प्लास्टिक पिशव्यांचा वापर, ओला कचरा जिरविण्यासाठी बल्क वेस्ट यंत्रणा कार्यान्वित न ठेवणे आदींवर दंडात्मक कारवाई केली जाते.

ही कारवाईची जबाबदारी ही क्षेत्रीय कार्यालये, संबंधित आरोग्य निरीक्षकांच्या माध्यमातून केली जात आहे. गेल्या तीन महिन्यांत महापालिकेच्या दंडात्मक कारवाईत वाढ झालेली असली तरी, अद्यापही काही क्षेत्रीय कार्यालयातंर्गत कारवाईचे प्रमाण कमी आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी कार्यालयीन पत्रकाद्वारे सर्व सहायक आयुक्त, सर्व क्षेत्रीय कार्यालय, आरोग्य निरीक्षक यांना दंडात्मक कारवाई वाढविण्याच्या तसेच जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

क्षेत्रीय कार्यालयांतर्गत केल्या जाणार्‍या दंडात्मक कारवाईचा दैनंदिन अहवाल मुख्य खात्याला नियमितपणे सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. शहर स्वच्छता व नियोजन कायद्यानुसार ही कारवाई करावी, नियमांचे उल्लंघन करणार्‍यांकडून प्रशासकीय शुल्क वसूल करावे, असेही आदेश दिले आहेत. त्यानुसार संकलित झालेल्या माहितीनुसार, 1 ऑक्टोबर ते 19 डिसेंबर या अडीच महिन्यांच्या कालावधीमध्ये महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये 18 हजार 258 कारवाया करून 72 लाख 43 हजार 148 रुपये दंड वसूल केला आहे.

सार्वजनिक ठिकाणी घाण करणार्‍यांवर करण्यात आलेल्या कारवाया

  •  थुंकणे : 396
  •  लघवी करणे : 466
  •  कचरा जाळणे : 662
  • ओला व सुका कचरा एकत्र देणे : 818
  •  घरगुती कचरा ‘स्वच्छ’च्या सेवकांना न देणे : 16
  •  कचरा टाकणे : 15,483
  •  कचरा प्रकल्प बंद : 23
  •  बांधकाम राडारोडा :123
  •  गणवेश परिधान न करणे : 38
  •  प्लास्टिक कारवाई : 207
  •  पाळीव प्राण्यांद्वारे अस्वच्छता करणे : 26
  •  एकूण कारवाया : 18,258
  •  एकूण दंड वसूल : 72,43,148 रुपये

हेही वाचा

Back to top button