लसूण @ 320 ; आवक कमी झाल्याने दर कडाडले | पुढारी

लसूण @ 320 ; आवक कमी झाल्याने दर कडाडले

पळसदेव : पुढारी वृत्तसेवा :  भाजीपाला बाजारात लसणाची आवक घटल्याने उपलब्ध मालाला मागणी वाढली असून लसणाच्या दराने उसळी घेतली आहे. सध्याच्या घडीला लसून प्रतिकिलो 270 ते 320 रुपये असा झाला आहे. गेल्या काही दिवसपासून कांद्याने चांगलाच भाव खाल्ला होता; आता मात्र कांद्याचे दर उतरत आहेत. दुसरीकडे लसणाच्या दराने मात्र उच्चांक गाठला आहे. यापूर्वी कांद्याने सर्वसामान्यांना रडविले होते. आता मात्र फोडणी देणारा लसूण ठसका आणत आहे. भाज्यांची चव वाढवणारा लसूण आता भाजीतूनच कमी होऊ लागला आहे. लसणाची वाढलेले दर हे काजू, बदाम, खोबरे यापेक्षा वरचढ होऊ लागले आहेत.

प्रत्येक घरात, हॉटेलमध्ये कांदा, लसून असतोच; परंतु लसणाची जागा हॉटेलमध्ये कमी होताना दिसत आहे. आता कुठे कांद्याचे दर कमी झाले, तर लगेच लसणाचे दर वाढल्यामुळे भाजीमध्ये लसूण, कांद्याशिवाय चव येत नसल्याचे मत गृहिणी व्यक्त करीत आहेत.
सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे लसणाची आवक कमी झाली आहे. नवीन लसूण बाजारात येण्यास आणखी दोन महिने लागणार असल्याने लसणाचे दर तोपर्यंत चढेच राहतील, असे व्यापार्‍यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

हेही वाचा :

Back to top button