

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पुनावळे येथील कचरा डेपोला आम्ही सुरुवातीपासूनच कडाडून विरोध केला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही प्रखर विरोध दर्शवला होता. दरम्यान, कचरा डेपोसाठी जागेच्या मोजणीस आलेल्या शासकीय अधिकार्यांनादेखील आम्ही माघारी पाठवून दिले. स्थानिक नागरिक आमच्यासोबत असल्यामुळे शासनाला कचरा डेपोच्या प्रकल्पासाठीच्या तांत्रिक बाबींची पूर्तता झाली नाही. त्यामुळे कचरा डेपो रद्दचे श्रेय पुनावळेकरांचेच असल्याचा दावा माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी केला आहे.
दरम्यान, पुनावळे येथील कचरा डेपो किती हानिकारक आहे, याबाबत चर्चा करण्यासाठी पुनावळे परिसराचे लोकप्रतिनिधी म्हणून राहुल कलाटे यांनी मागील पंधरा दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली होती. दोन्ही मंत्र्यांसोबत डेपो रद्द करण्याबाबत सविस्तरपणे चर्चा केली होती. त्या वेळी संबंधित मंत्र्यांनी कचरा डेपो रद्द करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानुसार, त्यांनी आपले शब्द खरे ठरवीत विधान परिषदेत कचरा डेपो रद्दची घोषणा केल्याचे कलाटे यांनी 'पुढारी'शी बोलताना सांगितले.
मागील दहा वर्षांत पुनावळेसह लगतच्या गावांचा कायापालट झाला आहे. येथे शेकडो उच्चभ्रू सोसायट्या तयार झाल्या आहेत. काही वर्षांतच येथील लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. कचरा डेपोमुळे रावेत बंधार्यातून शहराला होणार्या पाणीपुरवठ्यावरदेखील परिणाम होण्याची शक्यता होती. तसेच, डेपोसाठी हजारो वृक्षांची कत्तल करून पर्यावरणाची हानी करावी लागली असती. या सर्व बाबी विचारात घेत कलाटे यांनी येथील प्रस्तावित कचरा डेपोला तीव्र विरोध केला.
वनविभागाच्या स्पष्टीकरणानंतर श्रेयवाद
कचरा डेपो झाल्यास पर्यावरणाची मोठी हानी होणार असल्याचा मुद्दा आम्ही लावून धरला. या सर्व बाबींचा विचार करत काही दिवसांपूर्वी वन विभागाने जमीन देण्यास नकार दिला. त्यानंतर काही राजकीय मंडळी आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
हेही वाचा