पिंपरी चौकात एअर प्युरिफिकेशन फाउंटन | पुढारी

पिंपरी चौकात एअर प्युरिफिकेशन फाउंटन

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरातील दूषित हवा शुद्ध करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध 17 चौकांत एअर प्युरिफिकेशन फाउंटन उभारण्यात येत आहेत. त्या यंत्राद्वारे पाण्याचे तुषार हवेत सोडून हवेतील प्रदूषण कमी केले जाते. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यातील एक फाउंटन पिंपरी चौकात उभारण्यात आला आहे. दिल्ली शहराच्या धर्तीवर महापालिका ही नवी संकल्पना शहरात राबवित आहे. वायू व जल प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाकडून नवनवीन संकल्पना राबविल्या जातात. राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाअंतर्गत (एनसीएपी) शहरातील 17 चौकांत 12 ड्राय मिस्ट टाईप वॉटर फाउंटन आणि 9 ठिकाणी एअर प्युरिफीकेशन फाउंटन उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

लग्न समारंभात प्रवेशद्वारावर सुगंधी द्रव्य फवारले जाते. त्याप्रमाणे या फाउंटनचे काम असणार आहे. दर दहा मिनिटांनी हे फाउंटनद्वारे पाण्याचे तुषार उडविले जातात. त्यामुळे हवेतील धुळीकण जड होऊन खाली बसतात. चौकांच्या चारी रस्त्यांवर हे आकर्षक रचनेतील फाउंटन बसविण्यात येत आहेत. पाणीपुरवठा करण्यासाठी त्याखाली 500 ते 1 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात आली अहे. या कामासाठी 3 कोटी 90 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. हा निधी राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाअंतर्गत केंद्र शासनाने दिला आहे. एअर प्युरिफीकेशन उभारण्याचे काम शहरात अंतिम टप्प्यात आले आहे.

तसेच, मुव्हेबल फॉग कॅनन डस्ट सप्रेशनची 5 वाहनेही आहेत. पाण्याच्या टँकरप्रमाणे असलेली ती पाच वाहने रस्त्यांवर फिरून पाण्याचे तुषार उडवित आहेत. तसेच, मोशी कचरा डेपोतील बांधकाम राडारोडा प्रकल्पात एक कोटी खर्च करून डस्ट सप्रेशन यंत्रणा बसविली जाणार आहे.

मोठे रस्ते वाहनांद्वारे धुणार
शहरातील 18 मीटर रूंदीचे सर्व रस्ते यांत्रिक पद्धतीने आठवठ्यातून एकदा पाण्याने स्वच्छ धुण्यात येत आहेत. त्यासाठी रोड वॉशरची 8 पैकी 2 वाहने वापरण्यात येत आहेत. रस्ते धुण्यासाठी सांडपाणी केंद्रात (एसटीपी) प्रक्रिया केलेले वापराचे पाणी वापरले जाते. ती वाहने खरेदीसाठी 1 कोटी 75 लाखांचा खर्च करण्यात आला आहे. ते काम आठ क्षेत्रीय कार्यालयानिहाय तीन वर्षे मुदतीचे आहे.

चौकांतील अतीदूषित हवा शुद्ध करण्याची प्रणाली
वातावरणात तरंगणारे धुळी कण श्वसनाद्वारे फुफ्फसात जातात. त्यामुळे नागरिकांना गंभीर आजार होतात. हे धुळीचे कण पाण्याच्या तुषारामुळे पाण्यासोबत जड होऊन खाली जाऊन बसतात. त्यामुळे हवा शुद्ध होण्यास मदत होते. त्यासाठी शहरात अधिक वर्दळीच्या चौकांत एअर प्युरिफीकेशन फाउंटेन उभारण्यात येत आहेत, असे महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे सहशहर प्रमुख संजय कुलकर्णी यांनी सांगितले.

या चौकात एअर प्युरिफीकेशन फाउंटेन बसविण्याचे काम सुरू
पिंपरी चौक, भोसरी चौक, खंडोबा माळ चौक, नाशिक फाटा, चिंचवड स्टेशन, कस्पटे चौक, होळकर चौक, नेहरूनगर चौक, चिखली आरटीओ चौक, चिंचवड गाव चौक, रावेत-भोंडवे चौक, मोशी गोदावून चौक, रांका गॅस स्टेशन, विसर्जन घाट चौक, कोकणे चौक, तळवडे चौक, एम. एम. स्कूल चौक.

Back to top button